कराड प्रतिनिधी | नेत्यांच्या फोडाफोडीबद्दल शरद पवारांना नोबेल पुरस्कारच दिला पाहिजे, अशी खोचक टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपल्या सोयीपसाठी जे इकडे तिकडे गेले असतील, त्यांना लोक माफ करणार नाहीत, असंही उदयनराजे म्हणाले.
दुष्काळी भागातीय योजना कोणाच्या काळात झाल्या
निवडणुकीच्या काळात कोणी इकडे तिकडे गेले असतील. परंतु, दुष्काळी भागात औद्योगिकरण, पाणी योजना कोणाच्या काळात झाल्या? असा सवाल करून खासदार उदयनराजे म्हणाले, खंडाळा, माण, खटाव, फलटण या दुष्काळी भागात पाणी पोहोचलं. त्यातून त्या भागाच्या विकासाला गती आली. त्यामुळे लोक कोणाला निवडून द्यायचं ते ठरवतील.
अतुल भोसलेंचा विजय निश्चित
खा. उदयनराजे म्हणाले की, कराड दक्षिणमधील महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले हे मताधिक्क्याने निवडून येतील. कारण, त्यांचं कामच बोलतंय. त्यामुळे मी फार काही सांगायची गरज नाही. महायुतीचे सर्व पदाधिकारी त्यांच्या विजयासाठी आहोरात्र काम करत आहेत. त्याची परिणती विजयात होईल.
पृथ्वीराज चव्हाणांकडून धडधडीत खोटा आरोप
आमचे सरकार आल्यानंतर बोगस टेंडरची चौकशी करणार असल्याचा इशारा पृथ्वीराज चव्हाणांनी दिला होता. त्याला प्रत्युत्तर देताना डॉ. अतुल भोसले यांनी शासन निर्णय आणि बांधकाम विभागाकडील पत्र माध्यमांसमोर सादर केले. विद्यमान आमदारांनी धडधडकीत खोटा आरोप केला आहे. कामाचे टेंडर प्रसिध्द झाले असून ट्रेझरीत ९ कोटी ६५ लाख रूपये देखील आले आहेत. माध्यमांशी याची शहानिशा करून वस्तुस्थिती जाणून घेण्याचं आवाहन डॉ. भोसले यांनी केलं.