सातारा -सातार्यातून लोकसभेची उमेदवारी मिळण्याबाबत खुद्द खासदार उदयनराजे भोसले यांनाच साशंकता आहे. उमेदवारीच्या संदर्भाने विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. आताच सगळं उघड केलं तर कसं होणार? लोकांचा आग्रह पण लक्षात घेतला पाहिजे, असे उदयनराजेंनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. त्यामुळे सातारा लोकसभा मतदार संघात भाजपचा उमेदवार कोण असणार, याचा सस्पेन्स वाढला आहे.
सातार्यातील उमेदवारीचा सस्पेन्स वाढला
राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी सध्या सातारा शहरात विकासकामांचा धडाका लावला आहे. अनेक विकासकामांची पाहणी ते करत आहेत. काही कामे पुर्णत्वास आली आहेत तर काही कामे सुरू आहेत. तसेच अनेक कामे नियोजित आहेत. या कामांची पाहणी आणि आढावा उदयनराजेंनी घेतला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सातार्यातील भाजपच्या उमेदवारासंदर्भातील सस्पेन्स वाढवला. इच्छूक अनेकजण असतात, पण लोकांचा आग्रह पण लक्षात घेतला पाहिजे, अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
उदयनराजेंनी संपर्क वाढवला
विकासकामांच्या निमित्ताने खासदार उदयनराजे यांनी सातारा शहर आणि परिसरातील लोकांशी संपर्क वाढवला आहे. शहिद कर्नल संतोष महाडिक स्मारकासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून स्मारकाचे काम गतीने सुरू आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते स्मारकाचे उदघाटन करण्याचा उदयनराजेंचा प्रयत्न आहे. त्यांचा वाढलेला संपर्क पाहता उदयनराजे सातारा लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे दिसत आहे.
सगळं आताच कसं उघड करणार?
सातारा लोकसभा उमेदवारीच्या प्रश्नावर बोलताना उदयनराजेंनी माध्यमांना सावध प्रतिक्रिया दिली आहे. सगळं आताच उघड केलं तर कसं होणार? लोकांचा आग्रह असतो. तो पण लक्षात घेतला पाहिजे, असे उदयनराजे म्हणाले. प्रत्येक जण आपापले काम करतो. आता आम्ही कामे केलीत म्हणून सगळे येऊन बघतात, असा टोला त्यांनी नाव न घेता आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना लगावला.
भाजप, राष्ट्रवादीचा सावध पवित्रा
सातारा लोकसभेसाठी भाजपमधून अनेक जण इच्छूक आहेत. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांचेही इच्छुकांमध्ये नाव आहे. भाजपप्रमाणेच राष्ट्रवादीत देखील उमेदवारीचा तिढा आहे. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांचे वय झाले आहे. त्यामुळे त्यांचे सुपूत्र सारंग पाटील यांनी संपर्क वाढवला आहे. दुसरीकडे अजित पवार गट भाजपबरोबर गेल्यामुळे शरद पवारांच्या सातारा या बालेकिल्ल्याला हादरा बसला आहे. त्यामुळे विधानसभा मतदार संघ निहाय ताकदीचा आढावा घेऊनच भाजप आणि राष्ट्रवादीला आपला उमेदवार निश्चित करावा लागणार आहे.