सातारा प्रतिनिधी | केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांची नवी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी खासदार उदयनराजे भोसले यांनी काल भेट घेतली. यावेळी ग्रामीण विकासाच्या पायाभूत सुविधा अधिक भक्कम करण्यासाठी आणि कृषी क्षेत्रात सामूहिक शेती, सेंद्रिय शेती, शेतीपूरक व्यवसायासाठी सातारा जिल्ह्यातील विविध योजनांना केंद्राने भरभक्कम पाठबळ द्यावे. जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्रे, कृषी संशोधन केंद्रांची उभारणी करावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
या वेळी काका धुमाळ, अॅड. विनीत पाटील, दिल्ली येथील स्वीय सहायक करण यादव उपस्थित होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील घरकुल उद्दिष्टे व सातारा लोकसभा मतदारसंघातील गावांच्या शाश्वत विकासाबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले, “जिल्ह्यात आले, हळद,बटाटा, स्ट्रॉबेरी, सोयाबीन, घेवडा व इतर पिकांच्या मोठी लागवड होत असते. याबाबत संशोधन केंद्रांची उभारणी केल्यास विविधांगी संशोधनातून या पिकांच्या शास्त्रीय लागवडीसह उत्पादनवाढीला चालना मिळेल.” पश्चिम महाराष्ट्रातील बळीराजाला पारंपरिक आणि आधुनिक तांत्रिकतेच्या दृष्टीने मार्गदर्शन होण्यासाठी जिल्ह्यात केंद्र शासनाच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्रे स्थापन करावे, अशीही मागणी त्यांनी केली.