सातारा प्रतिनिधी । कै. लक्ष्मणराव इनामदार जिहे कठापूर उपसा सिंचन योजना वेटणे-रणसिंगवाडी येथील शेतीला पाणी मिळण्याची कार्यवाही होणेबाबत गेली 7 दिवसांपासून येथील ग्रामस्थांकडून उपोषण केले जात आहे. दरम्यान, चालू असलेल्या आमरण उपोषणाला खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच भेट दिली व आंदोलनकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी उपोषणस्थळावरून थेट उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. तसेच यांच्याशी फोनवर संपर्क करून या गावातीळ ग्रामस्थांच्या व्यथा सांगितल्या. फोनवरून झालेल्या चर्चेनंतर हा पाणीप्रश्न 2 ते 3 दिवसात मार्गी लावण्याच्या बाबतीत उपाययोजना करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
खासदार उदयनराजे भोसले यांनी उपोषणस्थळी भेट देत तेथील ग्रामस्थांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा वेटणे व रणसिंगवाडी या दोन्ही गावासाठी ०.१३ टीएमसी. पाणी उपलब्ध करुन देण्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ते म्हणाले की, या पाण्याचा उपसा करुन दोन्ही गावातील ग्रामतळी, पाझर तलाव, बंधारे कायमस्वरूपी पुर्ण क्षमतेने भरुन मिळतील. याकामी बोगद्यावरच असलेली वेटणे येथील खड़खीरा (नलवडेवस्ती) या हद्दीतील ६ एकर शासकीय जमीन (गायरान) सोलर पॅनलसाठी उपलब्ध करुन देऊ असा ठराव दोन्ही गावाच्या ग्रामस्थांनी केला असल्याची माहिती ग्रामस्थांनी उदयनराजेंना दिली.
त्यामुळे सोलर पॅनेलवर छोटी उपसा सिंचन योजना कार्यान्वीत करुन जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेतून विनामोबदला दोन्ही गावातील बेलमाळ तलाव, धबधबी तलाव, रणसिंगवाडी तलाव क्रमांक १ व रणसिंगवाडी तलाव क्रमांक २, खडखीरा (नलवडेवस्ती) ग्रामतळे, इनाम तलाव वेटणे, वेटणे ग्राम तलाव व दोन्ही गावातील बंधारे गरजेनुसार कायमस्वरुपी पुर्ण क्षमतेने भरून मिळावेत अशी आमची आग्रही मागणी आहे. यासर्व मागण्या विनाशर्त मंजूर करण्यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल हा शब्द खासदार उदयनराजे यांनी दिला. तसेच उपोषणकर्त्यांच्या जीवितास उपोषण करत असताना काही धोका झाल्यास त्यांना सर्वस्वी या जिहे कटापुर योजनेचे अधिकारी असतील, असा इशारा देखील त्यांनी दिला.