सातारा प्रतिनिधी | गेल्या तीन दिवसांपासून महाबळेश्वर मुक्कामी असलेले राज्यपाल रमेश बैस यांची आज भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी राजभवन येथे जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी सुमारे अर्धा तास राज्यातील विविध विकासाच्या विषयावर चर्चा केली. आणि गडकिल्ल्यांचे संवर्धन, मराठ्यांच्या राजधान्यांचा सुचीबद्ध विकास आणि छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या अधिकृत इतिहास केंद्र सरकारने प्रसिद्ध करावा, अशा मागण्या त्यांनी राज्यपालांकडे केल्या.
आज सकाळी खा. उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज्यपालांच्या भेटीवेळी खा. उदयनराजे यांनी सातारा जिल्ह्यातील अनेक विकास कामासंदर्भात चार हा केली. कृष्णा नदीचे सुशोभिकरण आणि शुध्दीकरण करण्यासाठी ‘नमामी गंगा’ योजनेच्या धर्तीवर ‘नमामी कृष्णा’ योजना महाराष्ट्रासह इतर राज्यात राबवणे, बौध्द सर्किट किंवा रामायण सर्किटप्रमाणे शिवस्वराज्य सर्किट योजना मार्गी लावणे.
यातून छत्रपतींचा जाज्वल्य इतिहास अधिकाधिक वृध्दींगत करण्याकरीता तसेच मराठा साम्राज्याच्या पाऊलखुणा जपण्यासाठी राजगड, रायगड आणि सातारा या तीन राजधान्यांचा समयसुचीबध्द विकास करणे. पानीपत ते तंजावर मधील ऐतिहासिक स्थळांचा आणि परिसराचा सुयोग्य विकास साधावा. जेणेकरुन मराठा साम्राज्याच्या समृध्द इतिहास परंपरेचे अवलोकन करण्यासाठी जगभरातून इतिहासप्रेमी याठिकाणी भेट देतील.तसेच पर्यटनाला देखील अधिक चालना मिळेल.
किल्ले प्रतापगडसह राज्यातील गडकिल्यांचे संवर्धन योजना आखणे. महाबळेश्वर-पाचगणीच्या विकासासाठी उच्यस्तरीय संनियंत्रण समितीवर, संसद- विधीमंडळ प्रतिनिधींसह, स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून महाबळेश्वर आणि पाचगणीच्या नगराध्यक्षांची नियुक्ती करावी, आदी मागण्या खा. उदयनराजे यांनी केल्या.