‘थोरले प्रतापसिंह महाराजांनी सर्वप्रथम स्त्री शिक्षणासाठी शाळा सुरू केली, महात्मा फुलेंकडून अनुकरण’; उदयनराजे भोसले यांचे वक्तव्य

0
45
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी महत्वाचे विधान केले. थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सर्वप्रथम आपल्या राजवाड्यात स्त्री शिक्षणाची शाळा सुरू केली आणि महात्मा फुले यांनी त्यांचे अनुकरण केले, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.

यावेळी उदयनराजे म्हणाले, “एका दृष्टीकोनातून पाहिलं तर महात्मा फुलेंनी थोरले प्रतापसिंह महाराज यांचं अनुकरण केलं. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत जर कोणी सर्वप्रथम पाऊल उचललं असेल, तर ते थोरले प्रतापसिंह महाराज होते. त्यांनी स्वतःच्या राजवाड्यात स्त्रियांसाठी शाळा सुरु केली होती. विशेष म्हणजे, याच राजवाड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण झालं.”

या ऐतिहासिक उल्लेखांबरोबरच, उदयनराजे भोसले यांनी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या प्रगतीबाबतही चिंता व्यक्त केली. “कदाचित तांत्रिक किंवा पर्यावरण विषयक अडचणी असतील, पण जर त्या ठिकाणी अडचण असेल, तर अरबी समुद्रालगत अठ्ठेचाळीस एकर जागा उपलब्ध आहे. एवढ्या मोठ्या जागेत स्मारक उभारता येईल,” असं ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, मी यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांच्याशी आणि इतर संबंधितांशी चर्चा केली असून, त्यांनी यावर स्पष्ट घोषणा करावी अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमात महापुरुषांच्या कार्याचा सन्मान करताना सामाजिक सलोखा, स्त्री शिक्षण, आणि ऐतिहासिक स्मारकांच्या जपणुकीच्या गरजेवर भर देण्यात आला.