कराड प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या कराड येथील सैदापुरातील नियोजित सभास्थळाची आज पाहणी केली. उदयनराजे भोसले यांनी कराड शहरासह विद्यानगर, सैदापूर परिसरातील मान्यवरांशी व नागरिकांशी यावेळी संवाद साधला.
महायुतीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांच्याकडून सध्या जिल्हाभर प्रचार केला जात आहे. त्यांनी आज कराड येथे भेट देत कराड शहर, विद्यानगर व सैदापुरातील विविध मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या. दरम्यान, खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी कराड येथे येत्या दि. ३० एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य सभा घेण्यात येणार आहे. या सभेसाठी नियोजित असलेल्या सैदापूर येथील ३५ एकरवर पसरलेल्या विस्तीर्ण सभास्थळाची पाहणी करण्यात आली.
यावेळी उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींची सभा ऐतिहासिक बनविण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत. तसेच सभेच्या तयारीला सोमवारपासून वेग येणार असून, सभेसाठी भव्य मंडप उभारण्यात येणार असून, एक लाख लोकांची आसनक्षमता या मंडपात तयार करण्यात येणार आहे.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, श्रीनिवास जाधव, सुनील काटकर, मोहनराव जाधव, राजेंद्रसिंह यादव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सागर शिवदास, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, सुहास जगताप, उमेश शिंदे, प्रशांत कुलकर्णी, प्रमोद शिंदे, धनाजी जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.