सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील औद्योगिक विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. सातारा येथे आयटी पार्कचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे. या आयटी पार्कसाठी जागेची हस्तांतरण प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. सातारा शहराच्या विकासासाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याची माहिती खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी स्व. छ. प्रतापसिंह महाराज ऊर्फ दादा महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त स्व. श्री. छ. प्रतापसिंह महाराज ऊर्फ दादा महाराज लायब्ररीचे उद्घाटन करण्यात आले. या लायब्ररीचा शुभारंभ खा. उदयनराजे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खा. उदयनराजे भोसले यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सातारा जिल्ह्यात उद्योगधंदे आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. इन्फोसिसच्या सुधा मूर्ती यांच्याशीही चर्चा करून त्यांच्या हुबळी येथील आयटी पार्कचा अनुभव घेण्यात आला आहे. पुण्यात जागा उपलब्ध नसल्याने सातारा येथे आयटी पार्क स्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासाठी पत्र देण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्याच्या जुन्या राजवाड्याच्या देखभालीबाबतही खा. उदयनराजे यांनी पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले. राजवाड्यात संग्रहालय उभारण्याची कल्पना आहे, ज्यामुळे ऐतिहासिक वास्तूची देखभाल होईल. मात्र, त्यासाठी शासनाकडून तातडीची पावले उचलणे आवश्यक आहे.