ESIC हॉस्पिटलसाठी भूखंड देण्याचा धोरणात्मक निर्णय; खा. उदयनराजे अन् मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीत चर्चा

0
478
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा येथे एमआयडीसी मधील सुमारे 20 हजार स्के.मिटरचा एमआयडीसीचा एएम-23 नंबरचा प्लॉट, एक रुपया प्रतिस्केअर मिटरप्रमाणे, ईएसआयसी हॉस्पिटल करीता देण्याचे धोरणात्मक निर्णय झाला आहे. दि.28 रोजीच्या ऑफर लेटरव्दारे एमआयडीसीने, ईएसआयसी हॉस्पिटल, मुंबई च्या व्यवस्थापनास कळविले आहे, कामगारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य हिताकरीता उभारणेत येणा-या ईएसआयसी हॉस्पिटलच्या उभारणीस त्यामुळे गती मिळणार आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

या पत्रकात खासदार उदयनराजे यांनी म्हटले आहे की, सातारा, लोणंद, खंडाळा, शिरवळ, कराड येथील औद्योगिक वसाहती आणि अन्य औद्योगिक क्षेत्रातांमधील कामगारांच्या पगारातून ईएसआयसाठी कपात होत असते. त्या बदल्यात कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सेवा दिल्या जातात. कामगारांची संख्या विचारात घेऊन 2022 साली केंद्र सरकारकडे हॉस्पिटलचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. केंद्राकडून सातार्‍यासाठी 2023 मध्ये ईएसआयसी हॉस्पिटल मंजूर करून घेण्यात आले आहे.

या हॉस्पिटलसाठी एमआयडीसीतील जागादेखील निश्चित करण्यात आली होती; परंतु भूखंड वितरीत करण्यासाठी शासनाने बाजारभावाप्रमाणे रक्कम भरावी, अशी अट एमआयडीसीने घातली होती. मात्र, शासनाच्या एका महामंडळाकडून दुसर्‍या महामंडळाला जागा उपलब्ध करुन देण्यासाठी बाजारभावाप्रमाणे रक्कम देण्याची गरज नसल्याची ठोस भूमिका मी घेतली होती. त्यामुळे याबाबत पुनर्विचार होऊन, एक रुपया प्रति स्क्वेअर मीटर, अशी प्रीमियम रक्कम निश्चित करण्यात आली आहे. तसे ऑफर लेटर एमआयडीसीकडून ईएसआयसीकडे (राज्य कामगार विमा महामंडळ) पाठवण्यात आले आहे. त्यामुळे सातार्‍यात 20 हजार स्क्वेअर मीटर जागेवर सुसज्ज ईएसआयसी हॉस्पिटल उभारण्यातील मोठा अडसर दूर झाला आहे.

आता राज्य कामगार विमा महामंडळाने 15 दिवसांत पाच हजार रुपये अनामत रक्कम आणि भूखंडाच्या वितरणासाठी एमआयडीसीकडे अर्ज सादर करून, भूखंड वितरणाबाबतची प्रक्रिया मुदतीत पार पाडणे गरजेचे आहे. याकामी ईएसआयसीच्या व्यवस्थापनास मी लवकरच सूचना देणार आहे. प्राथमिक बाबींची पूर्तता झाल्यावर एमआयडीसीतील एएम-23 या भूखंडावर ईएसआयसी हॉस्पिटलसाठी निधी मिळवणे आणि कामगारांना शक्य तितक्या लवकर वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे उदयनराजे यांनी नमूद केले आहे.