Udayanraje Bhosale : उदयनराजे शाहांच्या भेटीसाठी दिल्लीत ठाण मांडून; इकडं नरेंद्र पाटलांनी भाजपकडं मागितलं तिकीट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सध्या सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छूक असलेले माजी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे सध्या दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून ठाण मांडून बसले आहेत. उदयनराजेंचा दिल्लीतील आजचा तिसरा दिवस असून आज त्यांची भेट अमित शाह यांच्याशी होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, इकडे साताऱ्यात वेगळ्याच घडामोडी घडत आहेत. 2019 लोकसभेला शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांचा उदयनराजे भोसले यांनी 1 लाख 26 हजाराच्या मताने पराभव केला होता. त्या माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी सातारा मतदारसंघातून मला उमेदवारी द्यावी, अशी मागणी भाजपाकडे केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘गेल्यावेळी मी शिवसेनेकडून लढलो होतो. उदयनराजेंविरोधात लढायला कुणीच तयार होत नव्हता. पण मी लढलो आणि चार लाखांच्यावर मते घेतली होती. आमच्या दोघांच्या मतांमध्ये फक्त ३० ते ३५ हजारांचा फरक होता. सातारा लोकसभा मतदार संघात माझी चांगली पकड आहे. भाजपच्या चिन्हावर मला ही संधी मिळावी, अशी इच्छा आहे. खासदार म्हणून मला चांगली काम करण्याची संधी मिळेल. ग्रामीण भागासह शहरी भाग, राज्यात माझा चांगला जनसंपर्क आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे हे मला न्याय देतील अशी आशा आहे.

सातारा निवडणूक जागेसाठी पेच निर्माण झालेला आहे. मात्र, पक्षाचा निर्णय हाच अंतिम निर्णय असतो. मग तो निर्णय कोणाच्या बाजूने लागेल सांगता येत नाही. पण केंद्रात मोदी यांच्या बाजूने 405 खासदार देण्यासाठी आम्ही संयुक्तपणे काम करू. उदयनराजे हे मागील तीन दिवसांपासून दिल्लीत मुक्कामी आहेत. मात्र, त्यांना भेट मिळत नाही हे खूप वाईट आहे. उदयनराजे यांनी सबुरीने घ्यायला हवे, पक्ष जो निर्णय देईल तो मान्य करायला हवा, असे देखील नरेंद्र पाटील यांनी म्हंटले.

यादीत नाव नसल्याने उदयनराजेंनी घेतली होती फडणवीसांची भेट

भाजपकडून काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील 20 लोकसभा उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, यामध्ये उदयनराजे भोसले यांच्या नावाचा समावेश नसल्याने त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला होता. या मुद्द्यावरुन उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी जाहीरपणे नाराजीही व्यक्त केली होती. परंतु, भाजपकडून या नाराजीची फारशी दखल घेण्यात आली नव्हती. यानंतर उदयनराजे भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली होती. परंतु, देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून समाधान न झाल्यामुळे उदयनराजे भोसले यांनी दिल्लीकडे धाव घेतली होती. आता दोन दिवस उलटल्यानंतरही उदयनराजे भोसले यांचा दिल्लीतच अडकून पडावे लागले आहे.