कृष्णा नदीच्या शुद्धीकरणासाठी ‘जय जय कृष्णे’ प्रकल्प राबवावा; खा. उदयनराजेंची केंद्र सरकारकडे मागणी

0
272
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । वाई शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असून, कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या या शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कृष्णा नदीचे शुद्धीकरण आणि सौंदर्यीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या शुद्धीकरणासाठी ‘जय जय कृष्णे’ प्रकल्प राबवावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे दिल्लीत भेट घेत आणि त्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

यावेळी श्री. काका धुमाळ, ॲड. विनित पाटील, श्री. चंद्रकांत पाटील, करण यादव उपस्थित होते. खा. उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाई हे केवळ तीर्थक्षेत्र नसून, बुद्धीचे माहेरघर म्हणूनही ओळखले जाते. येथे मराठी विश्वकोश मंडळ कार्यरत असून, यामुळे शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा जपला जातो. तसेच, वाईचे श्री महागणपती मंदिरासह अनेक मंदिर आणि ऐतिहासिक घाट हे कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या प्रमुख आकर्षणांपैकी आहेत. तसेच भुईंज, सगंम माहुली, प्रिती संगम कराड, श्री क्षेत्र नरसिंहवाडी आदी तीर्थक्षेत्रे नदी काठी वसलेली आहेत आणि तसेच बंगालच्या समुद्राला कृष्णा नदी जाऊन मिळते. परंतु, नदीच्या वाढत्या प्रदूषणामुळे तिचे स्वच्छता,सौंदर्य व पावित्र्यता धोक्यात आले आहे.

“नमामी गंगे योजनेच्या धर्तीवर कृष्णा नदीच्या शुद्धीकरणासाठी ‘जय जय कृष्णे’ हा कृष्णा नदी शुध्दीकरणासाठी प्रकल्प राबवण्यात यावा या प्रकल्पामुळे नदी स्वच्छतेबरोबरच नदी परिसराचे कायापलट होणार आहे. या योजनेंतर्गत उगमापासून संगमापर्यंत नदीचे शुद्धीकरण आणि पुनरुज्जीवन करण्याचा निर्धार अपेक्षित आहे. यामुळे पर्यावरणपूरक विकासास चालना मिळेल आणि जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रालाही मोठी संधी निर्माण होईल, असे मत खासदार उदयनराजे यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केले.

महाबळेश्वर, पाचगणी, प्रतापगड आणि वाई हा संपूर्ण परिसर देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. त्यामुळे या भागाचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक पावले उचलावीत, अशीही मागणी करण्यात आली. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि लवकरच केंद्र सरकार कडून याबाबत पुढील पावले उचलली जातील, अशी अपेक्षा देखील खा.उदयनराजे यांनी केल्या आहे.