सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुक २०२४ (Satara Lok Sabha Election 2024) साठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला अवघे तीन दिवस उरले असताना आज भाजपकडून छत्रपती उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale) यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. काल महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर उदयनराजे भोसले हे देखील गुरुवार दि. १८ रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. दरम्यान, आज सकाळी भाजपकडून (BJP) सातारा जिल्ह्यातून महायुतीचे उमेदवार म्हणून उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
सातारा लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीतून खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्लीवारी करून आल्यानंतर आपणच उमेदवार असणार असल्याचे सांगत प्रचारास सुरुवात देखील केली. मात्र, महायुतीतील शिंदे गटाकडून पुरुषोत्तम जाधव तर भाजपकडून नरेंद्र पाटील या दोघांनी देखील उमेदवारी आपल्याला देण्यात यावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्याचबरोबर अजित पवार गटानेही ही जागा आपल्यालाच मिळावी, अशी आग्रही मागणी लावून धरली होती. मात्र, सातारा लोकसभा मतदार संघ हा भाजपाकडे गेल्याने आज सकाळी उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर पक्षश्रेठींकडून शिक्कामोर्तब करण्यात आला.
BJP releases its 12th list of candidates for the Lok Sabha elections.
#LokSabaElection2024 pic.twitter.com/DihIkG6caV
— ANI (@ANI) April 16, 2024
शशिकांत शिंदे आणि उदयनराजेंमध्ये होणार लढत
सातारा लोकसभा निवडणुकीसाठी ‘मविआ’कडून काल मोठ्या शक्तिप्रदर्शनाने शशिकांत शिंदे यांचा उमेवारी अर्ज दाखल करण्यात आला. मात्र, महायुतीकडून कधी आणि कोणाला उमेदवारी दिली जाणार? याबाबत शंका व्यक्त केल्या जात होत्या. अखेर आज सकाळी भाजपकडून उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यामुळे आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे व भाजपचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले या दोघांमध्ये लढत होणार आहे.
उदयनराजेंकडून दिल्ली वारीनंतर प्रचारचा धडाका
दिल्लीत चार दिवस ठाण मांडल्यानंतर उदयनराजे साताऱ्यात आले. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी त्यांचे मोठ्या थाटात स्वागत केले. हा स्वागताचा कार्यक्रम झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट प्रत्यक्ष प्रचारालाच सुरुवात देखील केली. कराडसह महत्वाच्या विधानसभा मतदार संघात जाऊन कार्यकर्ते, समर्थकांच्या भेटीगाठी देखील घेतल्या. मतदारसंघातील बहुतांश गावांचा त्यांचा फेरा पूर्ण झाला आहे. त्यांच्याकडून उमेदवारी अर्जही नेण्यात आला असून अर्जासोबत अनामत रक्कम देखील काल भरण्यात आली आहे.
मुंबईतील बैठकीत साताऱ्याच्या जागेवर तोडगा
काल मुंबईत महायुतीची महत्वाची बैठक पार पाडली. या बैठकीत उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीसह नाशिकच्या जागेसंदर्भात चर्चा देखील करण्यात आली. मात्र, ही चर्चा अत्यंत गुप्त ठेवण्यात आली. महायुतीकडून साताऱ्याच्या जागेवर तोडगा काढण्यासाठी काल खूप प्रयत्न करण्यात आले. सरतेशेवटी तोडगा काढण्यात भाजपला यश आले आणि आज साताऱ्याच्या जागेचा तोडगा काढत दिल्लीतून भाजपकडून महायुतीचे सातारा लोकसभेसाठी उमेदवार म्हणून उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
१२ व्या यादीत स्थान
भारतीय जनता पक्षाकडून लोकसभेसाठीची आज १२ वी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील उमेदवारांची नावे असून महाराष्ट्रातील एकमेव उदयनराजे भोसले यांचे नाव या यादीत जाहीर करण्यात आले आहे. उदयनराजेंची आज उमेदवारी जाहीर होताच साताऱ्यात कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, उदयनराजे भोसले गुरूवारी, १८ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार असून यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.