सातारा प्रतिनिधी । भाजपच्या केंद्रीय कमिटीकडून आज प्रेसनोट जाहिर करत उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उदयनराजेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘केंद्रात आजपर्यंत अनेक सरकार होऊन गेले. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार खऱ्या अर्थाने कुणी पुढे नेण्याचे काम केले असेल तर भाजप, नरेंद्र मोदी यांच्या पक्षाने केले आहे. पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मसमभाव संकल्पना राबवली. तोच विचार उराशी बाळगून मी ३० वर्षे लोकांची सेवा करत आहे. लोकांचे भरभरुन आशिर्वाद मला मिळाले. तरुण, माता-भगिनींची साथ मिळाली. मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत, ते खऱ्या अर्थाने मोदींच्या राजवटीत राबवले जात आहेत”, असे उदयनराजे भोसले यांनी म्हंटले.
सातारा लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, लोकहिताच्या विरोधात जे काही असेल तर मी नेहमी आवाज उठवत आलेलो आहे. मला सर्वसामान्य लोकांचे हीत बघायचे आहे. भ्रष्टाचारी लोकांचे हित बघायचे नाही. काल शरद पवार साहेब जे काही बोलले. यशवंत विचारांबद्दल जर ते बोलत असतील तर त्यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर झालेल्या आरोपाबद्दल बोलणे गरजेचे होते मग ते काल का बोलले नाहीत?, अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले.
हा तर रडीचा डाव
शशिकांत शिंदे यांच्यावर महेश शिंदे व नरेंद्र पाटील यांनी जे काही आरोप केले आहेत. त्या आरोपाबद्दल कालच त्यांनी त्यांच्याकडे असलेले पुरावे सादर करून बोलणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. राजकारण केले जात असल्याचे वरवरचे बोलणे पसंद केले. माझ्यावर जर आरोप झाले आणि मी जर गप्प बसलो आणि वरवरची चर्चा केली तर काय उपयोग? हा तर रडीचा डाव आहे. घोटाळ्याबाबत कागदपत्रे सादर करत ते जामिनासाठी कोर्टात का गेले? मग हे सर्व घडलं ते काही खोटं आहे का? असा सवाल करत उदयनराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
…तर मी फॉर्म मागे घेण्याच्या तारखेपर्यंत माझा फॉर्म मागे घेईल
शशिकांत शिंदे यांनी म्हटलं होतं की भ्रष्टाचाराचे आरोप जर झाले तर मी फॉर्म भरणार नाही. परंतु त्यांनी आता फॉर्म भरलेलाच आहे. त्यामुळे त्यांनी आता नैतिकता दाखवत फॉर्म काढून घेण्याच्या तारखे अगोदर फॉर्म काढून घ्यावा. जर माझ्यावर झालेला एखादा जरी भ्रष्टाचाराचा आरोप दाखवला तर मी 18 तारखेला फॉर्म भरणार नाही, आणि फॉर्म भरल्यानंतरही जर भ्रष्टाचाराचा आरोप झाला तर मी फॉर्म मागे घेण्याच्या तारखेपर्यंत माझा फॉर्म मागे घेईल, असे चॅलेंज उदयनराजे यांनी शरद पवार यांना दिले आहे.