छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कायदा पारित करा, अन्यथा…; खा. उदयनराजेंचा थेट इशारा

0
337
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । साताऱ्याचे भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधला असून प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधानावर आपली भूमिका मांडली तसेच राज्य सरकारकडे मुख्य तीन मागण्या केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि इतिहासावर वादग्रस्त विधाने करणाऱ्या अशा विकृत लोकांची नसबंदीच केली पाहिजे. समाजात तेढ निर्माण करण्याचं काम जे करतात त्यांच्याविरोधात याच अधिवेशनात कायदा आणला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना खरेच तुम्ही दैवत मानत असाल तर महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून द्या, याच अधिवेशनात तुम्ही कायदा पारित करा, मग कुणी महाराजांबाबत बोलायचे धाडस करणार नाही, असे खा. उदयनराजे (Chhatrapati Udayanraje Bhonsle) यांनी म्हंटले.

खा. उदयनराजे भोसले यांनी जलमंदिर या त्यांच्या निवासस्थानी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराजांच्या बदनामीची विधाने करण्याच्या वादावर संतप्त भूमिका घेतली. यावेळी खा. उदयनराजे म्हणाले की, सत्ताधारी, विरोधक किंवा कुठल्याही पक्षाचे असू द्या, आज कित्येक निवेदन देऊन, सांगूनही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शासनमान्यतेने आणला जात नाही. सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शासनमान्य संपूर्ण खंड पद्धतीने प्रकाशित करावा. त्यामुळे इतिहासावरून जे वादविवाद होतात ते संपुष्टात येतील. आज कुणीही काहीही लिहितो, काल्पनिक चित्र रंगवतो याविरोधात सरकारने कायदा आणला पाहिजे. अनेक कुटुंब, घराणे असतील त्या लोकांनी संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी वेचले.

एखाद्या काल्पनिक कथेवरून चित्रपट प्रसिद्ध करतात त्याआधी एका समितीसमोर ही स्क्रिप्ट गेली पाहिजे. त्यावर ते अभ्यास करतील. काल्पनिक कथेवर आधारे इतिहास मांडला जातो तेव्हा तेढ निर्माण होतो. छावा चित्रपटानंतर कालच मला शिर्के कुटुंब भेटायला आले, संभाजी महाराजांना शिर्केंनी पकडून दिले असं कुठे इतिहासात नोंद नाही. आज कुठेही ते कुटुंब गेले तर लोकांची त्यांच्याकडे बघण्याची नजर बदलली असं ते सांगत आहेत.

दरम्यान, कुणीही काही विधाने करतात, त्यातून तेढ निर्माण होतात, दंगली घडतात. लोक मृत्युमुखी पडतात, हे काम थांबवण्याचं काम केवळ सत्ताधारी नाही तर विरोधक आणि सर्वच लोकप्रतिनिधींचं आहे. त्यामुळे या अधिवेशनात विशेष कायदा आणा, जर तुम्ही केले नाही असाच गोंधळ होत राहील. गोंधळ बंद करा, कायदा पारित करून अशा लोकांना शिक्षा करा. हा कायदा पारीत झाला नाही तर जनता तुम्हाला माफ करणार नाही. ही लोकांची मागणी आहे.

जर तुम्ही कायदा आणणार नसाल तर…

जर तुम्ही कायदा आणणार नसाल तर तुमचं महाराजांवर अजिबात प्रेम नाही हे लोकांना वाटेल. जर खरेच छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानत असाल तर कुणीही असो, कुठल्याही पक्षाचे असतील हा कायदा याच अधिवेशनात पारित करा. जनतेच्या भावना लक्षात घेऊन जर तुम्ही वागला नाही तर लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा सूचक इशाराही खा. छत्रपती उदयनराजे यांनी सरकारला दिला.

उदयनराजे यांच्या 3 मागण्या काय?

१) छत्रपती शिवाजी महाराज आणि इतिहासाबाबत बेताल वक्तव्ये करणाऱ्याविरोधात कठोर कायदा करावा
२) छत्रपतींचा इतिहास शासनमान्य करून खंड पद्धतीने तो प्रकाशित करण्यात यावा.
३) सिनेमॅटिक लिबर्टीतून जो इतिहास मांडला जातो, काल्पनिक चित्र रंगवलं जाते, त्याआधी संबंधित सिनेमाची कथा एका समितीकडून पडताळली जावी अंडी त्या समितीने अभ्यास करून त्याला मान्यता दिल्यानंतरच सिनेमा प्रदर्शित केला जावा.