.. तर आम्हाला वेगळा पवित्रा घ्यावा लागेल; खा. उदयनराजेंनी दिला थेट इशारा

0
2396
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्‍या कर्मचाऱ्यांचा पगारवाढीचा करारनामा तातडीने करण्‍याच्‍या मागणीसह फिनॅकल सॉफ्टवेअरबाबतच्‍या तक्रारींबाबत योग्य उपाययोजना राबविण्‍यात यावी मागण्‍यांबाबत सकारात्‍मक निर्णय न झाल्‍यास आम्हाला वेगळा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा संचालक तसेच खा. उदयनराजे भोसले यांनी बँक व्‍यवस्‍थापनास निवेदनाद्वारे दिला आहे.

जिल्हा बँकेचे अध्‍यक्ष, खासदार नितीन पाटील तसेच मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्‍या निवेदनात, बॅंकेच्‍या वाटचालीत कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे असून, कर्मचाऱ्यांच्‍या पगाराच्‍या करारनाम्याची मुदत गेल्‍या ३१ मार्चला संपलेली आहे. करारनामा रखडणे, त्‍याचे नूतनीकरण न होणे ही बाब अमृतमहोत्सवी वर्षात बँकेच्‍या ख्‍यातीला नामुष्‍की आणणारी आहे.

बोजा पडेल म्‍हणून करारनामा नूतनीकरणास चालढकल होत असेल, तर अमृतमहोत्‍सवी वर्षानिमित्त केलेल्‍या खर्चाची आठवणही संबंधितांना ठेवणे आवश्‍‍यक असल्‍याचे मत खासदार उदयनराजे यांनी निवेदनात नोंदवले आहे.

कर्मचाऱ्यांचे योगदान लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ करावी, तसेच फिनॅकल सॉफ्टवेअरबाबतीतील तक्रारींवर योग्य ती उपाययोजना करावी. तसे न झाल्‍यास आम्‍हाला वेगळा पवित्रा घ्‍यावा लागेल आणि त्‍यास बँक व्‍यवस्‍थापन, प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही उदयनराजे भोसले यांनी दिलेल्‍या निवेदनात नमूद केला आहे.