सातारा प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज, महायुतीचे उमेदवार छ. उदयनराजे भोसले आणि महाविकास आघाडीचे उमेदवार तथा माथाडी नेते शशिकांत शिदे यांच्यातील हाय व्होल्टेज लढतीकडे राज्याचं लक्ष लागून आहे. साताऱ्यात दोन्ही उमेदवारांसाठी राष्ट्रीय नेत्यांच्या सभाही होणार आहेत. तत्पूर्वी उदयनराजेंनी भाजप हा देशाचे भविष्य आणि काँग्रेस हा भूतकाळ असल्याचा जोरदार हल्लाबोल केला आहे.
सातारा : भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षांत देशाचा कायापालट केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे दूरदृष्टी असलेले खंबीर नेतृत्व देशाला मिळाले आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप हा देशाचे भविष्य आहे तर काँग्रेस हा भूतकाळ असल्याचा हल्लाबोल साताऱ्यातील महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे.
काँग्रेसमध्ये अनेकांचा उमेदीचा काळ वाया गेला
कोरेगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना उदयनराजे म्हणाले की, महिला सक्षमीकरण, तरुणांच्या हाताला रोजगार, संरक्षण दलांची सज्जता, सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधील प्रगती ही मोदींच्या नेतृत्वाखाली झाली आहे. काँग्रेसच्या ५० ते ५५ वर्षांच्या सत्तेच्या काळामध्ये अनेकांचा उमेदीचा काळ वाया गेला. काँग्रेसला दुसरा पर्याय नव्हता, त्यामुळे देशातील जनतेला गृहीत धरण्यात आलं आता मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचा चांगला पर्याय निर्माण झाल्याने गेल्या दहा वर्षांपासून जनता भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे.
मोदीच देशाचे नेतृत्व करणार
राज्यातील महायुती ही देशातील एनडीएचा घटक आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हेच देशाचे नेतृत्व करणार, हे निश्चित झाले असले आहे. परंतु, काँग्रेसच्या पुढाकाराने निर्माण झालेल्या इंडिया आघाडीला नेतृत्वच नसल्याची टीका खासदार उदयनराजेंनी केली. नेतृत्व नसलेली इंडिया आघाडी देशाचा काय w विकास करणार, असा सवाही उदयनराजेंनी केला.
काँग्रेस पक्षात निधीची गळती
आम्ही अनेक वर्षे काँग्रेसमध्ये काम केले असून निधीची मोठी गळती या पक्षात असते, असा आरोप कोरेगावमधील काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत उत्तम काम महाराष्ट्रात सुरू आहे. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, आरपीआय, रयत शेतकरी संघटना या सर्वांनी एकत्रित मिळून काम केले तर उदयनराजेंना मोठे मताधिक्क्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.