कोरेगावातील जाहीर मेळाव्यात उदयनराजे आक्रमक; म्हणाले, यापुढे जिल्ह्याचे राजकारण…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभेच्या खासदारकीच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले निवडून आले. निवडून आल्यानंतर त्यांचा आज आमदार महेश शिंदे यांच्यावतीने कोरेगाव येथे सत्कार करण्यात आला. यावेळी उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटावर निशाणा साधला. “यापुढे सातारा जिल्ह्याचे राजकारण मी आणि शिवेंद्रराजे करणार आहोत,” अशा शब्दात उदयनराजेंनी आपल्या हटके स्टाईलमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला इशारा दिला.

कोरेगाव येथील ‘जितराज’ मंगल कार्यालयात कोरेगाव विधानसभा मतदार संघातील सर्व महायुतीच्या हितचिंतक, सन्माननीय कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे समवेत आभार मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी आमदार महेश शिंदे, डॉ. प्रियाताई शिंदे, डॉ. अरुणा बर्गे, श्री. शिवाजीराव महाडिक, श्री. सुनील खत्री, श्री. जयवंत पवार, श्री. भरत मुळे, संदीप शिंदे, रणधीर जाधव, राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले की, उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या या लढतीत जय-पराजयाच्या पलिकडे जावून, देशाच्या जनतेने या निकालाकडे पाहीले. सामान्य मतदारांच्या जोरावर मिळालेल्या या विजयश्रीचे खरे श्रेय महायुतीमधील प्रत्येक कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकारी यांचे आहे. त्यामुळेच जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या ऋणात राहुनच त्यांच्या विषयी आदरभावयुक्त आभार मानण्यासाठी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदार संघानिहाय आभार दौऱ्याचे आयोजन आजपासून करण्यात आलेले आहे. महायुतीला मतदान केलेल्या मतदारांचे प्रामुख्याने आभार मानताना, पुढील काळात अधिक सक्षमपणे लोकसेवा जनहितासाठी सुरुच ठेवण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे.

सदर आभार दौऱ्यात आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, रिपाई कवाडे गटाचे युवराज कांबळे, मनसे नेते धैर्यशील पाटील, युवराज पवार, डॉ. महेश गुरव, हिम्मतराव माने, पवन निकम तसेच महायुतीतील घटक पक्षातील ज्येष्ठ मार्गदर्शक व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.