कराड प्रतिनिधी । भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी कराड येथील प्रीतिसंगमावरील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी नाव न घेता राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. “यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. मी मागणी केली नाही म्हणून विरोधक टीका करत असतील तर ज्यावेळी पुरस्कार मिळेल त्यावेळी कळेल. मी काही यशवंतराव चव्हाण यांचा मानसपुत्र नाही. जे मानसपुत्र आहेत, त्यांच्याकडे सत्ता असताना, त्यांनी आजपर्यंत पुरस्काराची का मागणी केली नाही? असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला.
नुकत्याच पार पडलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले हे विजयी झाले. यानंतर त्यांच्या विजयाप्रित्यर्थ कराड येथे उदयनराजेंचा जाहीर सत्कार करण्यात आला. तत्पुर्वी त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. मी मागणी केली नाही म्हणून विरोधक टीका करत असतील तर ज्यावेळी पुरस्कार मिळेल त्यावेळी कळेल. यासाठी एक समिती असते. ज्या लोकांनी राजकारणाला दिशा देण्याचं काम केलं, त्यांना पुरस्कार मिळाला पाहिजे.
कराड शहरात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. सुरेश (बाबा) भोसले, भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, श्री. मदनराव मोहिते, श्री. विनायकबाबा भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, विक्रमजी पावसकर, लोकसभा समन्वयक श्री सुनील काटकर, कराड दक्षिण शिवसेना नेते श्री. राजेंद्र यादव, कराड दक्षिण विधानसभा निवडणूक प्रमुख धनाजी काका पाटील, श्री. राजेश पाटील, श्री. विजय यादव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.