‘शिवेंद्रराजेंना मंत्री करा’ म्हणत टॉवरवर आंदोलन; उदयनराजेंनी त्या होमगार्डला फोनवर केलं आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । छत्रपती घराण्याचा मान राखा, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश करून चांगले पद द्यावे, अशी मागणी करत जालना जिल्ह्यातील सदाशिव ढाकणे या कर्मचाऱ्याने बुधवारी ‘मोबाइल टॉवर’वर चढून आत्महत्येचा इशारा दिला. याची माहिती मिळताच खुद्द खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यास फोन करून समजूत काढली. तो टॉवरवरून उतरत नसल्याने उदयनराजे यांनी माझी शपथ आहे, जिवाचं बरं-वाईट करू नको, असे सांगितल्यानंतर ढाकणे खाली उतरला.

राजूर-टेंभुर्णी रोडवर असलेल्या एका मोबाइल टॉवरवर बुधवारी सकाळी सदाशिव ढाकणे हा चढला. त्याने महायुतीच्या नेत्यांना चार तासांची मुदत देऊन मंत्रिमंडळात कॅबिनेटपदी शिवेंद्रराजे यांना घ्यावे, अशी मागणी केली. छत्रपती घराण्याचा मान देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आदी नेत्यांनी राखावा, असे आवाहन करत मोबाइल टॉवरवरून खाली उडी टाकण्याचा इशारा दिला. याची माहिती कळताच खासदार उदयनराजे भोसले यांनी त्या युवकाचा नंबर मिळवून त्यास फोन केला.

त्याची चौकशी करून तुमचं आयुष्य एवढं स्वस्त नाही. तुमच्या भावना कळल्या आहेत. तुम्ही खाली उतरा. मेहरबानी करा, पण डोक्यात असे विचार आणू नका. तुमच्या कुटुंबीयांनी कोणाकडे बघून जगायचं. माझी शपथ आहे, छत्रपती शिवरायांची शपथ देतो. खाली उतरा, असे आवाहन केल्यानंतर तो युवक खाली उतरला.