सातारा प्रतिनिधी | जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. या घटनेनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. तर खासदार श्रीनिवास पाटील यांनी मराठा समाजबांधवांना न्याय हा दिलाच पाहिजे अशी आग्रहाची मागणी केली आहे.
अनेक दिवसांपासून जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी (ता. आंबड) गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजातील युवकांकडून शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. आंदोलन सुरू असताना या ठिकाणी एकत्रित आलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला. तसेच हवेत गोळीबार करून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. लाठीहल्ल्यात माता -भगिणी जखमी झाल्या. यावर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजेंनी म्हंटले आहे की, पोलिसांची ही कृती अतिशय संतापजनक आणि निंदनीय आहे. या घटनेचा मी निषेध व्यक्त करत आहे.
शासनाने या संपूर्ण प्रकरणात तातडीने लक्ष घालून या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी. आंदोलनकर्त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी आग्रही मागणी देखील खा. उदयनराजे यांनी केली आहे.
मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जच्या घटनेचा उदयनराजेंकडून निषेध तर श्रीनिवास पाटलांनी केली 'ही' मागणी pic.twitter.com/PBEzfjlMFE
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) September 2, 2023
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी देखील या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणासाठी जालना येथे सनदशीर मार्गाने आंदोलन करीत असलेल्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. हा अतिशय संतापजनक प्रकार आहे. हा लाठीहल्ला करून आज मराठा समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मराठा समाजाला न्याय मिळायलाचं हवा, अशी मागणी खा. श्रीनिवास पाटील यांनी केली आहे.