राजधानी साताऱ्यात अवतरली शिवशाही; दोन्ही राजेंनी एकत्रित केली छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची आरती

0
394
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यात बुधवारी शिवशाही अवतरल्याची प्रचिती पुन्हा एकदा सातारकरांना आली. शिंग तुतार्‍यांचा निनाद… टाळ-मृदंगाचा नाद… ढोल-ताशांचा गजर… फटाक्यांची आतषबाजी करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारुढ पुतळ्याची भव्य मिरवणूक राजवाडा येथून काढण्यात आली. यावेळी घोडे, हत्ती, उंट यासह केरळी लोकनृत्याने मिरवणूक मार्ग दणाणून सोडला. वतीने बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची राजवाड्यापासून शिवतीर्थ (पोवईनाका) अशा भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवतीर्थ पोवई नाक्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास खासदार छत्रपती उदयनराजे भोसले व मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अभिवादन करत पूजन केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती महोत्सव समिती राजधानी, सातारा यांच्या वतीने तीन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची राजवाड्यापासून शिवतीर्थ (पोवईनाका) अशा भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सायंकाळपासूनच गांधी मैदानावर शिवप्रेमींनी गर्दी करायला सुरुवात केली.

मोती चौक, चांदणी चौक, मोती तळे परिसर अलोट गर्दीने फुलून गेला. शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमींसाठी गांधी मैदानावर केरळी पारंपरिक वाद्यांचे आयोजन करण्यात आले होते. केरळी वाद्यांनी शिवप्रेमींची मने जिंकली. टाळकर्‍यांनी केलेल्या गजरात सातारकर मंत्रमुग्ध झाले.

प्रचंड गर्दीमुळे मिरवणुकीचा माहोल तयार झाला. सायंकाळी 7.30 च्या सुमारास गोल बाग येथील छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी अभिवादन केले. त्यानंतर ना. शिवेंद्रराजे भोसले, पुणे विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्ष हरिष पाटणे, अमोल मोहिते यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ झाला.

‘छत्रपती शिवाजी महाराज की… जय,’ ‘हर हर महादेव,’ जय श्रीराम अशा दिलेल्या घोषणांनी गांधी मैदान दुमदुमून गेले. वाद्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीत मिरवणुकीला प्रारंभ झाला. अग्रभागी असलेले हत्ती, घोडे, उंट मिरवणुकीचे आकर्षण ठरले. केरळी लोकनृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. केरळी लोकनृत्य सादर करणार्‍या कलावंतांसोबत सेल्फी घेण्याचा मोह सातारकरांना आवरला नाही. ही मिरवणूक राजवाडा-मोती चौकातून राजपथावरुन कमानी हौद चौकमार्गे खालच्या रस्त्याने शेटे चौक-पोलिस मुख्यालय ते पोवईनाका अशी काढण्यात आली. चौकाचौकात फटाक्यांची जोरदार आतषबाजी होत होती.