सातारा प्रतिनिधी । राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महायुती सरकारचा नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन शपथविधी होणार आहे. या सरकारमध्ये सातारा जिल्ह्यात कोणाला मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यामध्ये आ.शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ.महेश शिंदे, कराड उत्तरचे आ. मनोज घोरपडे, कराड दक्षिणचे आ.अतुल भोसले,आ. मकरंद पाटील आणि आ. जयकुमार गोरे यांच्या नावाची चर्चा आहे. यादरम्यान, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी चार आमदारांसह नुकतीच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवेंद्रराजेंना मंत्री करा, अशी मागणी करत खा. उदयनराजे भोसले यांनी मी स्वतः सातारा जिल्ह्यात आणखी भाजपची वाढ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा शब्दच फडणवीसांना भेटी दरम्यान दिला आहे.
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन भेट घेतली. याप्रसंगी कराडचे आमदार अतुल भोसले हेही उपस्थित होते. त्यानंतर सागर बंगल्यावर जाऊन भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांचा सत्कार केला. यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले, कोरेगावचे आ.महेश शिंदे, कराड उत्तरचे आ. मनोज घोरपडे, कराड दक्षिणचे आ.अतुल भोसले यांची उपस्थिती होती.
विशेष म्हणजे या भेटीनंतर शिवेंद्रराजेंच्या मंत्री पदासाठी खा.उदयनराजे सरसावले पुढे सरसावल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून सुरू आहे. उदयनराजेंनी 5 आमदारांसह खा. उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेकांना आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
अजितदादांकडून काल साताऱ्याच्या मंत्रिपदाबाबत संकेत
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी अजित पवार काल कराडला आले होते. यावेळी त्यांनी नवीन मंत्रिमंडळातील मंत्रीपदाबाबत महत्वाचे विधान केले. “साताऱ्याला निश्चितपणे मंत्रिपद मिळेल, माझं साताऱ्याकडे कायम लक्ष राहिलं आहे. मी साताऱ्याचा पालकमंत्री होतो. साताऱ्याला झुकते माप देण्याचे काम कालही करत आलो आहे, आजही करतोय आणि उद्याही करत राहणार आहे, असे स्पष्टपणे अजित पवार यांनी सांगितले. त्यांच्या या विधानानंतर वाईचे आमदार मकरंद पाटील यांच्या मंत्रिपदाची चर्चा सुरु झाली.