‘छावा’ चित्रपटातील आक्षेपार्ह चित्रण वगळण्‍याच्या खासदार उदयनराजेंनी निर्मात्यांना दिल्या सूचना

0
655
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । छत्रपती संभाजीराजेंच्या जीवनावर आधारित तयार करण्यात आलेल्या चित्रपदाची सध्या चांगलीच चर्चा होतेय. या छावा चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेत घेण्यात आल्याने चित्रपटाचे प्रदर्शन देखील लांबले आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपतींचे थेट तेरावे वंशज भाजपचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्याशी संपर्क साधत “चुकीचा इतिहास लोकांसमोर जाऊ नये, म्हणून आक्षेप असलेली दृश्ये वगळून चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित करा, अशी सूचना केली आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्‍याशी नुकताच फोनवरून संवाद साधला. चित्रपटातील दृश्याच्या अनुषंगाने माहिती घेत सूचना केल्‍या. यावेळी त्‍यांनी चित्रपटात काही आक्षेपार्ह चित्रण असल्‍यास ते वगळण्‍यास, तसेच त्यानंतरच चित्रपट प्रदर्शन करण्‍यास सांगितले.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर ‘छावा’ हा हिंदी चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका अभिनेता विकी कौशिल याने साकारली आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज लेझीमवर नृत्य करतानाचे दृश्य दाखवले आहे. चित्रपट प्रदर्शनाआधीच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या संभाजी महाराज यांच्या नृत्याविष्कारावर अनेक शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकासोबत झालेल्या संवादावेळी खा. उदयनराजे यांनी म्हटले आहे की, आजच्या पिढीसमोर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी देशासाठी, धर्मासाठी दिलेले योगदान योग्‍य पद्धतीने सर्वांसमोर येणे आवश्‍‍यक आहे. या चित्रपटाच्‍या अनुषंगाने चित्रपटांतील काही प्रसंगाबाबत चर्चा सुरू आहेत. त्‍याबाबत इतिहास तज्ज्ञ, अभ्यासकांशी चर्चा करत त्‍यांना हा चित्रपट दाखवावा. त्‍यानंतर व्‍यवस्‍थित मांडणी करत चित्रपट प्रदर्शित करावा. जेणेकरून समाजामध्‍ये तिढा निर्माण होणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सर्वांपर्यंत पोचेल व त्‍यातून आजच्या पिढीला त्यांचे असलेले योगदान खऱ्या अर्थाने समजेल. यासाठी चित्रपट इतिहास तज्ज्ञ, अभ्‍यासकांना दाखवत तो लवकर प्रदर्शित करण्‍याच्‍या सूचना केल्या.

‘छावा’मधला लेझीमचा सीन डिलीट करणार : लक्ष्मण उतेकर

छावा चित्रपटातील या सीनबद्दल शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केल्यानंतर लक्ष्मण उतेकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “आज राज ठाकरेंची भेट त्यांचा सल्ला घेण्यासाठी होती. त्यांच वाचन दांडगं आहे, त्यांना इतिहास ज्ञात आहे. त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांवरही खूप वाचन आहे. त्यामुळे चित्रपटात नेमका काय बदल करावा? हे मी त्यांच्याकडून जाणून घेतलं. आणि याच चर्चेतून त्यांनी मला काही सूचना केल्यात. ते बदल आम्ही करणार आहोत.” असे उतेकर यांनी म्हटले.