कराड प्रतिनिधी । संतोष गुरव
काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी गुरु पौर्णिमेनिमित्त सातारा जिल्ह्यातील कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन करत नवे रणशिंग फुंकले. राजकीय गुरूंचे दर्शन घेत त्यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली. तर दुसरीकडे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत त्यांना तलवार आणि वाघ नख्यांची प्रतिकृती दिली. यावेळी “फडणवीसजी राज्याचा कारभार तुम्ही यशस्वीपणे पार पाडा साताऱ्याचे राजे सदैव तुमच्यासोबत आहेत, असे उदयनराजे यांनी म्हंटले. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.
साताऱ्याचे भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यांची मैत्री सर्वांनाच माहिती आहे. खा. उदयनराजे भोसले यांच्याकडून अधून-मधून उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली जाते. त्यांच्या भेटीमागची अनेक कारणे काढली जातात. खा. उदयनराजे भोसले यांनी नुकतीच फडणवीसांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेही उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर दोघांच्यामध्ये अनेक मुद्यांवर चर्चा झाली. त्यामध्ये सातारा शहर व जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या बाबतीत व प्रलंबित प्रकल्पांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली. मात्र, गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने दोघांची झालेली भेट आणि खा. उदयनराजेंनी फडणवीसांनी दिलेली भेट हि खरंच गुरुदक्षिणा तर नाही ना, अशी चर्चा लोकांमध्ये होऊ लागली आहे.
उदयनराजेंच्या भेटीनंतर फडणवीसांकडून Facebook Post
छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन त्यांना तलवार आणि वाघ नख्याची प्रतिकृती भेट दिली. यानंतर दीघनि चहापान केले. यावेळी दोघांच्यात काहीवेळ चर्चा झाली. चर्चेनंतर खा. उदयनराजे तेथून परतले. यानंतर आज देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करत ‘छत्रपती खासदार उदयनराजे भोसलेजी यांचे मनःपूर्वक आभार !’ असे म्हंटले.