सातारा प्रतिनिधी | राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांची साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल पवारांचे तलवार भेट देत अभिनंदन केले. तसेच सातारा जिल्हयामध्ये जुन्या असलेल्या ब्रिटिशकालीन धोकादायक पुलांच्या ठिकाणी नवीन पर्यायी पूल उभारणी करण्याची मागणी यावेळी उदयनराजेंनी केली.
उदयनराजे भोसले यांनी अजितदादा पवार यांच्या भेटीवेळी अनेक मुद्यांवर चर्चा केली. यावेळी सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामांबद्दल सविस्तर चर्चा करत त्यांनी काही महत्वाच्या मागण्याही केल्या. तसेच सातारा जिल्ह्यामध्ये पर्यटनवाढीसाठी खूप मोठा वाव आहे निसर्गाने सातारा जिल्ह्यावर मुक्तहस्त उधळण केली आहे पर्यटन वाढीच्या माध्यमातून स्थानिकांना व गरजूंना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते. पर्यटन विकासाच्या माध्यमातून जिल्ह्याचा व स्थानिक लोकांचा मोठ्या प्रमाणावर विकास होऊ शकतो असे उदयनराजे भोसले म्हणाले.
यावेळी अजितदादांच्या भेटीदरम्यान कृषी क्षेत्रातील विविध विषयांवर उदयनराजेंनी चर्चा केली. संभाव्य दुष्काळजन्य परिस्थिती पाहता व धरणांतील पाण्याचा साठा लक्षात घेता योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी पुरवणे गरजेचे झाले आहे यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे उदयनराजे म्हणाले.