‘अशांना गोळ्या घालून नाही तर…’; अक्षय शिंदे ‘एन्काऊंटर’वर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूरमधील खासगी शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी अचानक पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या घटनेनंतर सत्ताधारी महायुती सरकारमधील शिवसेनेसह इतर पक्षांनी या कारवाईचं समर्थन केलं. तसंच पोलिसांच्या कारवाईचं जोरदार कौतुकही केलं आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त करत महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या घटनेवर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील आज साताऱ्यात प्रतिक्रिया देत अक्षय शिंदेसारख्या गुन्हेगारांना गोळ्या घालण्यापेक्षा लोकांच्यात सोडून तुडवून मारले पाहिजे,” असे म्हंटले आहे.

आज भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अशा गुन्हेगारांना गोळ्या घालून मारणे हे अतिशय सहज झाले. या लोकांना जनतेत सोडले पाहिजे. आणि जनतेने त्यांना तुडवून मारले पाहिजे. पीडित मुलीच्या कुटुंबाला ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, त्या कुटुंबाच्या जागेवर मी स्वत:ला ठेवून मी बोलत असतो. सत्ताधारी – विरोधक मला काही घेणं देणं नाही. सत्ताधारी असू दे किंवा विरोधक जे कोणी असू दे त्यांच्या कुटुंबासोबत हा प्रसंग घडला असता तर काय केलं असतं? असं बोलले असते का? असा सवालही उदयनराजेंनी यावेळी केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जी न्यायव्यवस्था होती, त्या प्रकारचीच न्यायव्यवस्था आता असायला हवी. त्यासाठी कायद्यात बदल करावा लागला तरी काही हरकत नाही, असेही उदयनराजे यांनी स्पष्टपणे सांगितले.