सातारा प्रतिनिधी | साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराबाहेरील भिंतीवर रेखाटल्या गेलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांच्या तैलचित्राचा ‘ईश्यू’ झाल्याने हे तैलचित्र रातोरात पुसले गेले आहे. लोकसभा निवडणुकीत याचा फटका बसू नये म्हणून चित्र पुसून ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.
सातारा शहरात पोवई नाक्यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे घर आहे. या घराच्या बाजूलाच असलेल्या मोठ्या इमारतीच्या भिंतीवर काही महिन्यांपूर्वी खासदार उदयनराजे यांच्या प्रेमापोटी एका चित्रकाराने त्यांचे भव्य तैलचित्र रेखाटले होते. त्या वेळेपासूनच ते तैलचित्र वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. चित्र काढतानाच त्याला पोलिसांकडून अटकाव करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्यावेळी दोन पावले मागे घेण्याची भूमिका देसाई यांना घ्यावी लागली होती. पण दररोज घरातून पाऊल बाहेर काढला की देसाई यांना ते चित्र पहावे लागत होते.
याचा हिशेब करण्याचा मोका लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने देसाई गटाने उघडपणे साधल्याचे मागील दोन-चार दिवसातील घटनांवरून स्पष्ट झाले आहे. उदयनराजे भोसले यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली. मात्र पाटण तालुक्यात त्यांनी घेतलेल्या मेळाव्यास देसाई गटाला डावलले गेल्याचे तात्कालिक निमित्त पुढे करून उदयनराजे यांना अडचणीची ठरेल अशी एक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.
त्या पोस्टमध्ये शंभूराज देसाई यांच्या घराबाहेरील उदयनराजेंचे भव्य तैलचित्र तसेच साताऱ्यात लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाला सुरुवातीला झालेला विरोध याचा उल्लेख आहे. या पोस्टचा मास्टर माईंड कोण हे उघड गुपित असल्याचे बोलले जात आहे. मात्र चित्राचा इश्यू करणाऱ्यांकडून त्यांच्या कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडले आहे हे नक्की.
या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाईंच्या घराबाहेरील भिंतीवरील ते तैलचित्र रातोरात पुसले गेले आहे. निवडणुकीमुळे हे चित्र आचारसंहिता लागू होताच पडदा टाकून झाकून ठेवले होते. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर या तैलचित्राचा इश्यू झाल्यावर हे तैलचित्र रातोरात पांढऱ्या रंगाने पुसून टाकल्याचे पाहायला मिळाले. याबद्दल सातारकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
उदयनराजे यांना या लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियावरील हा इश्यू प्रतिकूल ठरेल, असे वातावरण तयार झाल्याने चित्र पुसले गेल्याची चर्चा आहे. हा सर्व महायुतीतलाच विसंवाद असला तरी त्याचा फटका निवडणुकीत बसू नये म्हणून ही काळजी घेतली गेली असल्याचे दिसते.