कराड प्रतिनिधी । सातारा शहरात सध्या आरोप-प्रत्यारोप आणि टीकांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, दोन्ही राजेंकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज सकाळी अचानक जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेतली. त्यांना पुष्पगुच्छ देऊन जिल्ह्यात स्वागत केले. यावेळी खा. उदयनराजे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासोबत शहरातील महत्वाच्या असलेल्या विविध विकास कामांसंदर्भात चर्चा केली.
सातारा जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी रुचेस जयवंशी यांची गेल्या महिन्यात बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणारे जितेंद्र डुडी यांची सातारा जिल्हाधिकारी पदी वर्णी लागली होती. जिल्हाधिकारी डुडी यांच्याकडून जिल्ह्याचा कारभार पाहिला जात आहे. मात्र, महिनाभरात छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली नव्हती.
खा. उदयनराजे भोसले यांनी आज दि. 17 रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी सातारा शहर व जिल्ह्यातील अनेक महत्वाच्या प्रलंबित व पूर्णत्वास असलेल्या विकासकामांच्या संदर्भात जिल्हाधिकारी डुडी यांच्यासोबत चर्चा केली. खासदार उदयनराजे भोसले यांनी जरी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असली तरी त्यांच्या भेटीमागे अनेक कारणे असल्याची चरचा सध्या सातारा शहरात सुरु आहे.