सातारा प्रतिनिधी । जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या ऋणात राहून त्यांच्या विषयी आदरभाव व्यक्त करण्यासाठी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदार संघानिहाय आभार दौरा सुरू केला आहे. सामान्य मतदारांच्या जोरावर मिळालेल्या विजयश्रीचे खरे श्रेय महायुतीमधील कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे आहे, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मसूर येथे अश्वमेध मंगल कार्यालयात आभार मेळावा झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, निवडणूक प्रमुख मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, चित्रलेखाताई कदम, कुलदीप क्षीरसागर, संपतराव माने, वासुदेवराव माने, भीमरावकाका पाटील, शंकरकाका शेजवळ, सचिन नलावडे, जितेंद्र डुबल, मनसेचे विकास पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
खा. उदयनराजे म्हणाले की, सातारा लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व विविध घटक पक्षाचे महायुतीमधील सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजनबद्ध कामाची पोहोच म्हणून माझा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. या लढतीत जय-पराजयाच्या पलिकडे जावून जनतेने या निकालाकडे पाहिले.
सामान्य मतदारांच्या जोरावर मिळालेल्या या विजयश्रीचे खरे श्रेय महायुतीमधील प्रत्येक कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकारी यांचे आहे. त्यामुळेच जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या ऋणात राहुनच त्यांच्या विषयी आदरभाव व्यक्त करण्यासाठी मतदार संघानिहाय आभार दौरा सुरू केला आहे. महायुतीला मतदान केलेल्या मतदारांचे प्रामुख्याने आभार मानताना, पुढील काळात अधिक सक्षमपणे लोकसेवा जनहितासाठी सुरुच ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही उदयनराजेंनी दिली.
आभार दौऱ्यात आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, रिपाई कवाडे गटाचे युवराज कांबळे, मनसे नेते धैर्यशील पाटील, युवराज पवार, डॉ. महेश गुरव, हिम्मतराव माने, पवन निकम तसेच महायुतीतील घटक पक्षातील ज्येष्ठ मार्गदर्शक व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.