सातारा प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरील शौर्याचे प्रतीक असलेली ऐतिहासिक वाघनखे लंडन येथील व्हिक्टोरिया ॲण्ड अल्बर्ट म्युझियममधून तीन वर्षांसाठी भारतात आणली आहेत. उद्या म्हणजेच शनिवारपासून (ता. २०) हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येणार आहे. आज प्रदर्शनाचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात वाघनखांबद्दल बोलताना उदयनराजेंचा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
साताऱ्यात पार पडलेल्या कार्यक्रमावेळी उदयनराजे भोसले म्हणाले की, प्रतापगडावर अफझल खानाचा वध करताना शिवाजी महाराजांनी जी वाघनखं वापरली त्या वाघनखांबद्दल बोलताना उदयनराजेंनी औरंगजेबाचा दाखला दिला. उदयनराजे बोलताना म्हणाले की, इथं आणल्यानंतर त्या वाखनखांकडं फक्त वाघनखं म्हणून पाहू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस स्वतःचा जीव धोक्यात घातला… त्यांनी जीवाची पर्वा न करता कारण की औरंगजेबासमोर… यांचं फारसं काय… त्यांची उंचीपण तेवढी नव्हती. पण त्यावेळेस त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून संपूर्ण…. फक्त एकच त्यांच्यासमोर विचार होता की लोकांचं भलं व्हावं…. माझा जीव गेला तरी चालेल. त्यामुळं अशा एका व्यक्तीच्या बाबतीत वाखनखं इथं आणली जातात, तेव्हा त्याचं पूजन करण्याऐवजी वाद विवाद कृपया करुन कोणी निर्माण करु नये, असं आवर्जून संबंधीत लोकांना सांगावं वाटतं, असे उदयनराजे म्हणाले.
लंडनहून आलेली ही वाघनखे मुंबईहून साताऱ्यात विशेष सुरक्षेत आणण्यात आली. ही वाघनखे साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील सुरक्षा पेटीत ठेवण्यात आली आहेत. या वाघनखांच्या सुरक्षिततेसाठी बुलेट प्रूफ काचपेटी, तसेच मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही कॅमेरे, लेसर सेंसर आदी यंत्रणा लावण्यात आल्या आहेत. यासोबतच पोलिस व बाहेरच्या एजन्सीकडे सुरक्षिततेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही वाघनखे सात महिने सातारकरांना पाहता येणार आहेत.