साताऱ्याचे खा. उदयनराजे दिल्ली दरबारी, केंद्रीय पर्यटनमंत्र्यांकडे महत्वाची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या स्वदेश योजनेअंतर्गत पर्यटकांसाठी बुद्ध सर्किट, रामायण सर्किट विकसित केली जात आहेत. याच धर्तीवर ‘शिव स्वराज्य सर्किट’ विकसित करण्यात यावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे.

खा. उदयनराजे भोसले यांनी किशन रेड्डी यांची दिल्ली येथे भेट घेतली आणि छत्रपती शिवरायांचा ओजस्वी इतिहास भारतीयांबरोबरच जगभरातील पर्यटकांनी प्रत्यक्ष भेट देऊन समजावून घ्यावा, अशी इच्छा व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, थोरले शाहू महाराज या सर्वांचेच शौर्य, पराक्रम आणि देदीप्यमान इतिहासाचा प्रसार व्हावा आणि त्यायोगे रोजगारनिर्मिती होऊन आर्थिक उन्नती व्हावी. त्यासाठी मराठ्यांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा असलेली सर्व ठिकाणे जागतिक पर्यटनाच्या नकाशावर यावीत, अशी संकल्पना त्यांनी मांडली.

या संकल्पित योजनेच्या सुरुवातीला स्वराज्याच्या राजधानी असणाऱ्या सर्व ठिकाणांचे सर्किट तयार करून दुसर्‍या टप्प्यात स्वराज्यातील प्रमुख घटना जिथे घडल्या त्या महाराष्ट्रातील आणि राज्याबाहेरील सर्व ठिकाणांचा त्यात समावेश करावा. उत्तरे पानिपत, आग्रा येथपासून ते दक्षिणेतील तंजावरपर्यंतच्या सर्व ठिकाणांचा अभ्यास करून त्यांचे एक सर्किट तयार करण्यात यावे. त्यामुळे जगभरातील पर्यटक या ठिकाणे भेटी देतील, असेही उदयनराजेंनी पर्यटनमंत्र्यांना सांगितले.

सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, पाचगणी व कास पठारासह अनेक पर्यटनस्थळे असून, त्यांचा प्रचार आणि प्रसिद्धी केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वत्र व्हावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली. केंद्र शासनाच्या वतीने टूरिजम नॅशनल कॉन्क्लेव्ह आयोजित करून स्थानिक पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी उदयनराजेंनी केली. पर्यटन वाढीसाठी तुम्ही जे प्रयत्न कराल त्यास केंद्र शासनाचे सहकार्य राहील, असे आश्वासन पर्यटनमंत्री किशन रेड्डी यांनी उदयनराजेंना दिले.