कराड प्रतिनिधी | राज्यातील राजकारणात आगामी विधानसभा लोकसभा, विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या राज्यात विविध राजकीय कार्यक्रमातून राजकीय नेतेमंडळी अनेक महत्वाची विधाने करीत आहेत. दरम्यान, आज कराड येथे आज 17 जानेवारी रोजी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून मोठं वक्तव्यं केलं आहे. ‘ज्याप्रकारे आज बैलगाडीचा कासरा धरला त्याच प्रमाणे आता राज्याचा कासरा हातात धरावा, अशी राज्यातील जनतेची अपेक्षा आहे,’ असे खा. भोसले यांनी म्हटले. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे आज, बुधवारी (17 जानेवारी) सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते दुपारी कराडमध्ये दाखल झाले. कराड विमानतळावर खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचं स्वागत केलं. कराडमध्ये एका कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले.
दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी फडणवीसांना स्वागतासाठी खास बैलगाडीची सफर घडवली. स्वागतातीथ्य स्वीकारताना फडणवीस यांनी बैलगाडीच सारथ्य केलं. यावेळी त्यांच्यासोबत बैलगाडीत खासदार उदयनराजे भोसलेही उपस्थित होते. उद्घाटनापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार उदयनराजे भोसले हे दोघेही बैलगाडीतून कार्यक्रमस्थळी आले. यावेळी उदयनराजे म्हणाले, बैलगाडीचा कासरा हातात धरला, आता राज्याचा कासरा हातात धरावा अशी राज्यातील जनतेची अपेक्षा आहे. उपमुख्यमंत्री फडणवीसांचा आजचा सातारा जिल्हा दौरा हा आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचा मानला जात आहे. अशात आता खा. उदयनराजेंनी फडणवीसांबाबत केलेल्या विधानाची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.