रेल्वेमंत्र्यांसोबतच्या भेटीवेळी खा. उदयनराजेंनी केली ‘या’ महत्वाच्या विषयावर चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या कराड- चिपळूण रेलवेमार्गासह रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी रेल्वे आणि दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. रेल्वेमार्ग दुपदरीकरणामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचा विषय तसेच अजिंक्यतारा एक्सप्रेस आणि बाधित शेतकऱ्यांच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने मागणी केली. खा. उदयनराजेंशी चर्चा झाल्यानंतर याबाबत तातडीने पाहणी करण्याच्या सूचना रेल्वेमंत्री वैष्णव यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या.

खा. उदयनराजे भोसले यांच्याकडून दिल्ली गेल्या काही दिवसांपासून अनेक मंत्र्यांच्या भेटीगाठी घेत सातारा जिल्ह्यातील अनेक प्रलंबित कामाचे प्रश्न, अडचणी या मांडल्या जात आहेत. दरम्या, त्यांनी नुकतीच रेल्वे आणि दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. दोघांच्यामध्ये जवळपास दोन ते तीन तास चर्चा पार पडली. या चर्चेवेळी रेल्वे मार्ग दुपदरीकरणामुळे कराड तालुक्यातील पार्ले हद्दीतील शेतीकडे आणि लोकवस्त्यांकडे जाणारे मार्ग बंद झाले आहेत.

त्यामुळे प्रचंड गैरसोय होत असल्याबाबत सरपंच आणि ग्रामस्थांनी खासदार उदयनराजेंची भेट घेतली होती. ही समस्या अग्रक्रमाने सोडविण्याची विनंती उदयनराजेंनी श्री. वैष्णव यांना केली. या ठिकाणी अंडरपास काढून रस्ते तयार केल्यास केवळ पार्लेच नव्हे तर वडोली निळेश्वर, रिसवड आणि लगतच्या अनेक गावांना लाभ होणार आहे, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. याबाबत तातडीने तांत्रिक पाहणी करण्याच्या सूचना श्री. वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

लोणंद हे भविष्यात जंक्शन होण्याची गरज आहे. या स्थानकाचा फायदा साताऱ्यासह पुणे, सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांनाही होतो. दर्शन एक्स्प्रेस, कोल्हापूर- अहमदाबाद एक्स्प्रेस, पूर्णा एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस आणि दादर-हुबळी एक्स्प्रेस या प्रमुख गाड्यांना लोणंदला थांबा द्यावा. फलाट क्रमांक एकची लांबी वाढवून सुशोभीकरण करावे, या मागण्या लोणंद प्रवासी संघटनेने उदयनराजेंकडे केल्या होत्या. याविषयीही मंत्री वैष्णव यांनी कार्यवाहीच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.

अजिंक्यतारा एक्सप्रेस’ची मागणी

सातारा सैनिकांचा जिल्हा असल्याने सुटीसाठी येणाऱ्या जवानांच्या सोयीसाठी यशवंतपूर संपर्क क्रांती एक्सप्रेस आणि कर्नाटक क्रांती एक्सप्रेस या गाड्यांना साताऱ्यात थांबा देण्याची मागणी केली. सह्याद्री एक्सप्रेसऐवजी सुरू करण्यात आलेली नवी गाडी पुण्यापर्यंतच न चालवता मुंबईपर्यंत चालवण्यात यावी, कामानिमित्त पुण्यास ये-जा करणाऱ्यांच्या सोयीसाठी पुणे-बेळगाव इंटरसिटी गाडी सुरू करावी, मुंबई ते पंढरपूर अशी गाडी सातारा, कऱ्हाड, सांगली, मिरजमार्गे सुरू करून तिला ‘अजिंक्यतारा एक्सप्रेस’ नाव द्यावे, झेलम, दुरांतोसारख्या गाड्या पुण्याऐवजी मिरज, कोल्हापूरपर्यंत सुरू कराव्यात, साताऱ्यात पिट लाइन, गाड्यांच्या देखभालीची तसेच रेल्वेत पाणी भरण्याची सुविधा उपलब्ध करावी, अशा मागण्या यावेळी केल्या.

कराड -चिपळूणचा डीपीआर तयार…

कऱ्हाड- चिपळूण रेल्वेमार्गाद्वारे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडण्याचे स्वप्न पाहणाऱ्या जनतेसाठी हा प्रकल्प हाती घेण्याची विनंती उदयनराजे यांनी श्री. वैष्णव यांना केली. या रेल्वेमार्गाचा नवा डीपीआर तयार करण्याचे काम हाती घेतले असून लवकरच ते पूर्ण करू, असे आश्वासन त्यांनी दिले. सातारा पोस्ट कार्यालयाच्या डागडुजी, दुरुस्तीसाठी केलेल्या निधीच्या मागणीस मंजुरी दिल्याबद्दल उदयनराजे यांनी श्री. वैष्णव यांचे आभार मानले तसेच या कामांसाठी जास्तीत जास्त निधी देण्याची मागणी खा. उदयनराजेंनी केली.

उदयनराजेंनी केल्या ‘या’ मागण्‍या

रेल्वेमंत्र्यासोबत झालेल्या चर्चेवेळी खा. उदयनराजेंनी काही महत्वाच्या मागण्या केल्या. 1) सातारा सैनिकांचा जिल्हा असल्याने जवानांच्‍या सोयीसाठी यशवंतपूर संपर्क क्रांती एक्स्प्रेस आणि कर्नाटक क्रांती एक्स्प्रेस या गाड्यांना साताऱ्यात थांबा द्यावा, 2) सह्याद्री एक्स्प्रेसऐवजी सुरू केलेली नवी गाडी मुंबईपर्यंत चालवावी, 3) कामानिमित्त पुण्यास ये- जा करणाऱ्यांच्या सोयीसाठी पुणे-बेळगाव इंटरसिटी गाडी सुरू करावी, 4) मुंबई ते पंढरपूर गाडी सातारा, कऱ्हाड, सांगली, मिरजमार्गे सुरू करून तिला ‘अजिंक्यतारा एक्स्प्रेस’ नाव द्यावे, 5) झेलम, दुरांतोसारख्या गाड्या पुण्याऐवजी मिरज, कोल्हापूरपर्यंत सुरू कराव्यात, साताऱ्यात पिट लाइन, गाड्यांच्या देखभालीची तसेच रेल्वेत पाणी भरण्याची सुविधा उपलब्ध कराव आदी मागण्या केल्या.