सातारा प्रतिनिधी । सातारा कास मार्गावर साताऱ्याहून कासकडे कारमधून फिरण्यासाठी निघालेल्या तरुणांवर काळाने घाला घातला. कारमधील चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार दुभाजकाला जोरदार धडकली. या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले तर तिघेजण गंभीर जखमी झाले. आज सोमवारी सकाळच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली.
अरहान फैजल शेख (वय १६, रा. गुरुवार पेठ, सातारा), सोहेल अन्सारी (१८, रा. बुधवार पेठ, सातारा) अशी जागीच ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहरातील पाच तरुण हे मारुती ८०० या कारमधून कासला फिरण्यासाठी निघाले होते. कास येथील वुड्स रिसाॅर्टजवळ त्यांची कार आली असता या ठिकाणी कारमधील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार दुभाजकाला जाऊन जोरदार धडकली.
हा अपघात इतका भीषण होता की, गाडीतील एक तरुण उडून रस्त्यावर फेकला गेला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील चाैघेही गंभीर जखमी झाले. यातील एकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर त्या ठिकाणाहून निघालेल्या नागरिकांनी अपघातातील जखमी तिघा तरुणांना तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या कार अपघातात एका तरुणाचे डोके डांबरी रोडवर आदळल्याने त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रप्रमाणात रक्तस्त्राव झाला. यामुळे सर्वत्र रक्ताचा सडा पसरला होता. अपघातस्थळी मोठ्या संख्येने नागरिकांनी देखील गर्दी केली होती.