सातारा जिल्ह्यातील दोघा तरुणांकडून थायलंडमध्ये जर्मन तरुणीवर सामूहिक अत्याचार; बीचवर गेले अन्…

0
3729
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । मित्रांसमवेत थायलंड येथे फिरायला गेलेल्या सातारा जिल्ह्यातील दोन तरुणांनी थायलंडमध्ये बीचवर एका जर्मन तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील हे दोन तरुण असून ते आपल्या मित्रांसमवेत थायलंड देशात फिरण्यासाठी गेले होते. थायलंड येथील बीचवर या दोघांनी जर्मन तरुणीवर सामूहिक अत्याचार केला. संबंधित पीडित तरुणीने कोह फांगन पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सीसीटिव्ही आणि काही साक्षीदारांच्या आधारावर दोन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे.

याबाबात अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील सहा मित्र थायलंड देशात फिरायला गेले होते. 14 मार्चला थायलंडच्या रिन बीचवर फुल मून पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी जर्मन तरुणी तिच्या मित्रासोबत आली होती. ही पार्टी पहाटेपर्यंत सुरु होती. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास विजय घोरपडे आणि राहुल भोईटे यांनी या तरुणीला बीचवरील एका खडकावर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यानंतर हे दोघेही कोह फांगन जिल्ह्यातील गाव क्रमांक 1 मधील बंगल्यावर निघून गेले. अत्याचार झाल्यानंतर जर्मन तरुणी शुद्धीत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी ही घटना उघडकीस आल्यानंतर त्यांचा तपास सुरु केला. कोह फांगन पोलीस स्टेशनच्या अधीक्षकांनी सुरुवातीला रीन बीचवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले.

जर्मन तरुणीने आरोप केल्याप्रमाणे गुन्ह्याच्या ठिकाणावरुन पळून जाणाऱ्या दोन संशयित भारतीय पुरुषांची ओळख पटवली. हे दोन्ही भारतीय पुरुष रिन बीचवरुन कोह फांगनकडे दुचाकीवरून गेले. कोह फांगन जिल्ह्यातील गाव क्रमांक 1 मधील बंगल्यात राहिले. त्यानंतर 15 मार्च रोजी कोह फांगन पोलीस ठाण्यात या दोघांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. या दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परदेशी महिला शुद्धीवर नसल्यामुळे ओळख पटवता आली नव्हती. त्यानंतर या दोघांना निवासस्थानी परतण्याची परवानगी देण्यात आली होती. 16 मार्चला पीडित जर्मन तरुणी शुद्धीवर आली.

यावेळी पोलिसांनी विजय घोरपडे आणि राहुल भोईटे या दोघांना परत चौकशीसाठी बोलावून घेतले. त्यावेळी तरुणीने या दोघांची ओळख पटवली. यानंतर पोलिसांनी घोरपडे आणि भोईटे यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. त्यावेळी विजय घोरपडे यांनी आपल्यावरील आरोप मान्य केले. तर राहुल भोईटे यांनी आरोप नाकारले. परंतु, पिडीतेला मिठी मारल्याचे आणि तिचे चुंबन घेतल्याचे कबूल केले. पण पीडितेने प्रतिकार केला म्हणून आम्ही तिच्यावर बलात्कार केला नाही, असा दावा राहुल भोईटे यांनी केला. यानंतर पोलिसांनी हिंसेचा वापर करुन बलात्कार केल्याप्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल केला. दरम्यान, या घडलेल्या प्रकारामुळे सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.