सातारा प्रतिनिधी | कास-बामणोली या दुर्गम भागातील एसटीने प्रवास करणार्या प्रवाशांच्या जीवाला धोका वाढला आहे. अशीच एक घटना नुकतीच सावरी तालुका जावली गावाच्या हद्दीमध्ये घडली. गोगवे सातारा बसची दोन चाके निखळून गेल्यामुळे भीषण अपघात होता होता वाचला. दैव बलवत्तर म्हणूनच एसटीतील प्रवासी सुखरूप राहिले.
सातारा एसटी आगारातून पहाटेे साडेपाच वाजता सुटणारी सातारा- कास – बामणोली – तेटली-गोगवे या एसटी बसला गोगवे होऊन परत माघारी सातारकडे येत असताना सावरी गावामध्ये अपघात झाला. सुदैवानेे कोणतीही जीवितहानी झाली नसून एसटी बसची पाठीमागील डाव्या बाजूची दोन्ही चाके निखळून पडली.
एक चाक निखळल्यानंतर प्रसंगावधान राखत चालकाने तशीच एसटी पुढे काही अंतरावर आणली होती. त्यावेळी दुसरे चाक देखील फाटून पूर्णपणे काळेश्वरी मंदिरानजिक आल्यानंतर निखळून पडले. हा संपूर्ण भाग डोंगराळ व वळणा वळणाचा घाटमाथ्याचा असल्याने या भागात सुस्थितीत चांगल्या एसटी बसेस पाठवण्यात याव्यात, अशी वारंवार मागणी होऊन देखील या भागांमध्ये नादुरुस्त भंगार झालेल्या बसेस पाठवल्या जात आहेत.