कराड प्रतिनिधी । माल वाहतूक टेम्पो आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेट वडील जागीच ठार तर बारा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. दुसरा पाच वर्षांचा मुलगा या अपघातातून सुदैवाने सुखरूप बचावला. कराड – चांदोली मार्गावरील कराड तालुक्यातील कालेटेक गावच्या हद्दीत मंगळवारी सकाळच्या सुमारास ही भीषण अपघाताची दुर्घटना घडली.
अंकूश मुरलीधर नडवणे (वय ४०, रा. विश्रामनगर, मलकापूर, ता. कराड) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर मुलगा ओंकार अंकूश नडवणे (१२) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातस्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील अंकूश नडवणे हे त्यांच्या दोन मुलांना सोबत घेऊन मंगळवारी सकाळी दुचाकीवरुन (क्र. एमएच ५० टी १२०१) उंडाळेच्या दिशेने निघाले होते.
त्यावेळी कालेटेक गावच्या हद्दीत डीपी जैन कंपनीसमोर उंडाळेहून कराडकडे निघालेल्या माल वाहतूक टेम्पोची (एमएच ५० – ५२४०) आणि दुचाकीची समोरा समोर धडक झाली. या अपघातात अंकूश नडवणे हे जागीच ठार झाले. तर मुलगा ओंकार हा गंभीर जखमी झाला. दुसऱ्या पाच वर्षीय मुलाला किरकोळ दुखापत झाली. परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेऊन जखमी ओंकार याला तातडीने रुग्णालयात हलवले. अपघाताची माहिती मिळताच कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याठिकाणी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. अपघाताची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.