सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. यातील काही मतदारसंघांत पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी समोरासमोर आलेले आहेत, तर काही ठिकाणी नवीन उमेदवार नशीब आजमावत आहेत. तरीही ही निवडणूक प्रामुख्याने महाविकास आघाडी आणि महायुतीतच होणार आहे. त्यातच काही मतदारसंघांत बंडखोरीही झालेली आहे. त्यामुळे निवडणुकीचे गणित बदलण्याचीही शक्यता आहे. आठही विधानसभा मतदारसंघांसाठी अर्ज दाखल झाले असून, बंडखोरांनीही दावेदारी ठोकली आहे. त्यामुळे सध्यातरी सहा मतदारसंघांत दुरंगी तर दोन ठिकाणी तिरंगी सामना होण्याचे संकेत आहेत. तरीही ४ नोव्हेंबरला अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशीच अंतिम लढाई कशी असेल, हे स्पष्ट होईल.
सातारा मतदारसंघात भाजपकडून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आहेत. तर विरोधात उद्धवसेनेकडून अमित कदम उतरलेत. याठिकाणी उद्धवसेनेच्या एस. एस. पार्टे गुरूजींनीही अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने कदम यांची चिंता वाढणार आहे. वाई मतदारसंघात युतीतील राष्ट्रवादीकडून आमदार मकरंद पाटील मैदानात उतरलेत तर आघाडीतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी दिली. त्यामुळे लढाईत चुरस निर्माण झाली आहे. पण युतीत बंडखोरी झाली. शिंदेसेनेचे माजी जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम जाधव मैदानात उतरलेत. त्यामुळे मतदारसंघात तिरंगी सामना होईल.
फलटण मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादीतच दुरंगी लढत होईल. आघाडीतील राष्ट्रवादीकडून आमदार दीपक चव्हाण तर युतीच्या माध्यमातून सचिन कांबळे रिंगणात आहेत. येथे दुरंगी आणि ‘काॅंटे की टक्कर’ अपेक्षित आहे. माण मतदारसंघात भाजपचे आमदार जयकुमार गोरे चाैथ्या विजयासाठी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात आघाडीतील राष्ट्रवादीकडून माजी आमदार प्रभाकर घार्गे उतरलेत. याठिकाणी घार्गे यांच्या पाठीशी मोठ्या नेत्यांची ताकद उभी आहे. पण, येथे आघाडीतील नाराज शेखर गोरे यांची भूमिका निर्णायक ठरेल. ते कोणाच्या पारड्यात मते टाकणार की बंधूच्या पाठीशी उभे राहणार, हे महत्त्वाचे आहे.
कोरेगाव, कराड उत्तर, दक्षिणमध्ये होणार काटे की टक्कर..
कोरेगाव मतदारसंघात दोन शिंदे आमदारांमध्ये लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे उभे आहेत. तर शिंदेसेनेकडून महेश शिंदे रिंगणात आहेत. ही लढत रंगतदार ठरणार आहे. कराड उत्तरमध्येही दुरंगीच सामना आहे. आघाडीतील राष्ट्रवादीकडून आमदार बाळासाहेब पाटील तर ‘भाजप’कडून मनोज घोरपडे नशीब अजमावत आहेत. कराड दक्षिण मतदारसंघात काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि ‘भाजप’चे डाॅ. अतुल भोसले यांच्यात पारंपरिक आणि दुरंगीच लढत होईल. पाटण मतदारसंघात तिरंगी सामना होणार आहे. शिंदेसेनेकडून पालकमंत्री शंभूराज देसाई हे सलग तिसऱ्या विजयासाठी मैदानात आहेत. तर आघाडीतील उद्धवसेनेने हर्षद कदम यांना उतरवले आहे; पण येथे आघाडीत बंडखोरी झाली असून, राष्ट्रवादीचे सत्यजितसिंह पाटणकर यांनी अर्ज भरला आहे. यामुळे तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.