कास तलावात जाणारा दोन टन कचरा सातारकरांच्या शेकडो हातांनी रोखला!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | ‘एकच ध्यास, स्वच्छ कास’, असा जयघोष करत आज सातारा नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांसह सातारकर नागरिकांनी सुमारे दोन टन प्लास्टिक कचरा कास तलावाच्या पाण्यात जाण्यापासून रोखण्यात यश मिळवले. दोन तास शेकडो हातांनी कचरा गोळा करून कासचा परिसर स्वच्छ केला.

कास तलाव हा सातारकरांचा मानबिंदू आहे. मात्र, प्लास्टिक कचरा टाकून पर्यावरणाला आणि कासच्या जलाशयाला प्रदूषित करण्याचा प्रयत्न बेशिस्त नागरिक करतात. पावसाळ्यामध्ये तलावातील पाणी पातळी वाढल्यानंतर हाच प्लास्टिकचा कचरा सातारा शहराची तहान भागवणाऱ्या कास तलावात जातो. उंची वाढविण्यात आल्यामुळे यंदा कास तलावात अधिक पाणीसाठा होणार आहे.

प्लास्टिक कच-यामुळे दूषित झालेले पाणी पिण्याचा धोका सातारकरांवर ओढवू शकतो, हे ओळखून सातारा नगरपरिषद व हरित सातारा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने कास तलाव परिसरात रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. हातमोजे, नाकावर मास्क व हातात पोती घेऊन हे स्वच्छता दूत कास तलावाचा काठ तसेच लगतच्या झाडीमध्ये शिरले. तलाव परिसरात खाद्यपदार्थांची वेस्टने, मद्याच्या व पाण्याच्या बाटल्या, मद्याचे कॅन, लहान मुलांचे डायपर, चपला-बूट, प्लास्टिकचे कागद, पत्रावळ्या, सिगरेटच्या पाकिटाची वेस्टने, यासारखा साचलेला कचरा पोत्यामध्ये भरून नगरपालिकेच्या वाहनातून सोनगाव कचरा डेपोमध्ये आणण्यात आला. तेथे त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यात आली.

कास तलाव परिसर तसेच तलावाच्या भिंतीलगतचा भाग या ठिकाणी सुमारे दोन टन प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. या मोहिमेमध्ये सातारा नगर परिषदेचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोड, निरीक्षक प्रवीण यादव, गणेश टोपे, आरोग्य अभियंता नितीन माळवे, हरित सातारा ग्रुपचे संजय मिरजकर, भालचंद्र गोताड, उमेश खंडूजोडे, निखिल घोरपडे, संजय झेपले, साईराज पवार, जय गायकवाड, न्यासा पाटील, चंद्रसेन फडतरे, दशरथ रणदिवे, अमृता भोसले हे सहभागी झाले होते.