सातारा प्रतिनिधी | येथील वाढे फाट्यावरील एका हॉटेलसमोर चालत जात असताना डॉ. अमितकुमार अर्जुन सोंडगे (वय ४०, मूळ रा. दक्षिण कसबा चौपाड, सोलापूर, सध्या रा. नवी मुंबई) यांना दोघा चोरट्यांनी चाकू आणि गुप्ती उगारून लुटले. त्यांच्याकडील सुमारे ६० हजार रुपये किमतीचा महागडा मोबाइल घेऊन चोरट्यांनी पलायन केले. ही धक्कादायक घटना दि. २३ रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अमितकुमार सोंडगे यांची साताऱ्यात बदली झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ते वाढे फाट्यावरील एका हॉटेलमध्ये मुक्कामासाठी थांबले आहेत. सोमवार, दि. २३ रोजी रात्री पावणेदहा वाजता जेवण झाल्यानंतर ते हॉटेलसमोरील सेवा रस्त्यावरून चालत होते. त्यावेळी दुचाकीवरून तेथे दोघे तरुण आले. त्यांच्या हातातील मोबाइल चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून घेतला.
तेव्हा डॉ. सोंडगे यांनी त्यांना कडाडून विरोध केला. हे पाहून एका चोरट्याने त्यांच्या तोंडावर जोरदार बुक्की मारली. त्यानंतर चाकू आणि गुप्ती उगारली. या प्रकारानंतर संबंधित दोघा चोरट्यांनी सातारा शहरात पलायन केले. डॉ. सोंडगे यांनी या प्रकाराची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन परिसरात नाकाबंदी केली; परंतु जबरी चोरी करणारे चोरटे सापडले नाहीत. वाढे फाटा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्यात अनोळखी दोघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक कुमार ढेरे हे अधिक तपास करीत आहेत.