वडिलांना औषध आणण्यासाठी ‘त्या’ दोघी बहिणी भावासोबत गेल्या अन् अज्ञात वाहनाची बसली धडक; पुढं घडलं असं काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । आपल्या वडिलांसाठी औषध आणण्यासाठी दोघी सख्ख्या बहिणी भावासोबत अॅक्टिव्हा दुचाकीवरुन गेल्या असता त्यांना अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली. या अपघातात सख्य्या बहिणींचा मृत्यू झाला असून भाऊ जखमी झाल्याची घटना पुणे-नाशिक महामार्गावर आळते फाटा येथे शनिवारी सकाळी घडली. या अपघातात जखमी झालेल्या अर्चना तानाजी कोठावळे (वय २८ रा. धावडशी), अमृता तानाजी कोठावळे (वय २६ रा. धावडशी) या सख्ख्या बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर भाऊ तेजस तानाजी कोठावळे (वय २१) (तिघेही रा. धावडशी, ता. सातारा) हा गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद नारायणगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील धावडशीतील तानाजी कोठावळे हे कामानिमित्त पुण्यात वास्तव्यास असून त्यांना अर्चना, अमृता व एक मुलगा तेजस असा परिवार आहे. अर्चना आणि अमृता या दोघीही कंपनीत नोकरी करत होत्या. दरम्यान, शनिवार दि. १८ रोजी वडिलांना केसांसाठीचे औषध आणण्यासाठी अमृता तानाजी कोठावळे (वय २६), अर्चना तानाजी कोठावळे (वय २८) या दोघी भाऊ तेजस तानाजी कोठावळे (वय २१) याच्यासमवेत दुचाकीवरून ट्रीपलसीट निघाल्या होत्या.

पुण्यातील नगररोडवर आळते फाट्यावर त्यांची दुचाकी आली असता त्यांच्या दुचाकीला चाकचाकीने जोरात धडक दिली. या धडकेमुळे तिघेही दुचाकीसह रस्त्यावर पडल्याने जखमी झाले. यामध्ये अमृता व अर्चना गंभीर जखमी झाल्या तर तेजसचा हात फॅक्चर झाला. त्यांना उपचारासाठी नारायणगाव येथील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथून पुढे भोसरी येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. पाच दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, बुधवार, दि. २२ रोजी अमृता व अर्चना यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन झाल्यानंतर गुरुवारी सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. जखमी तेजसवर अद्याप उपचार सुरु असून गुरुवारी धावडशी येथे अमृता व अर्चना यांचे मृतदेह आणल्यानंतर गावावर शोककळा पसरली होती. गावातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.