सातारा प्रतिनिधी | नव्याने बांधलेल्या घराशेजारी खेळत असताना शाळकरी दोन सख्खे चुलत भाऊ कालव्यात बुडाल्याची हृदयद्रावक घटना वाई तालुक्यातील खानापूर येथे घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, दुसर्या भावाचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. घराच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी कुटुंबीयांसह ते मुंबईवरून आले होते. या घटनेमुळे खानापूरवर शोककळा पसरली आहे.
अथर्व गोरख माने (वय 12) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर अर्णव अमोल माने (वय 8, दोघेही रा. मुंबई, मूळ रा. खानापूर) असे बेपत्ता असलेल्या दुसर्या चुलत भावाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळा वरून मिळालेली माहिती अशी, अर्णव व अथर्व यांच्या कुटुंबीयांनी खानापूर येथे घर बांधले आहे. त्याचा वास्तुशांतीचा कार्यक्रम असल्याने हे कुटुंब गावी आले होते.
रविवारी दुपारच्या सुमारास अथर्व व अर्णव हे सख्खे चुलतभाऊ घरात असताना कुटुंबियांना त्यांनी मोबाईल मागितला. मात्र, कुटुंबियांनी मोबाईल दिला नाही. त्यानंतरहे दोघेजण घरापासून 500 ते 700 मीटर अंतरावर असणार्या कालव्यानजीक खेळत होते. खेळता खेळता दोघे कालव्याच्या दिशेने गेले. तेथे तोल गेल्यामुळे दोघेही कालव्यात पडले. पाण्याच्या प्रवाहामुळे ते वाहत निघाले. जीवाच्या आकांताने मदतीसाठी त्यांनी टाहो फोडला.
ही घटना निदर्शनास येताच शेजारी काम करत असणार्या ग्रामस्थांनी कालव्याकडे धाव घेतली. तात्काळ शोध मोहीम राबवण्यात आली. यामध्ये काही अंतरावर अथर्वचा मृतदेह आढळून आला. मात्र, अर्णव सापडू शकला नाही. या घटनेमुळे परिसर हेलावून गेला. भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि रमेश गर्जे व कर्मचार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मदत कार्यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले. मात्र, रात्री उशिरापर्यंत अर्णवचा शोध लागला नाही.