कराड प्रतिनिधी | खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याने सातारा लोकसभा मतदार संघातील रेल्वे विषयीचे अनेक प्रश्न मार्गी लागले असून कराड आणि लोणंद या दोन्ही रेल्वे स्टेशनचा अमृत महोत्सव योजनेतून कायापालट होणार आहे. तर अन्य चार ठिकाणी अंडरपास ब्रिज होणार असून ह्या कामांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवार दि.२६ रोजी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
पुणे-मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरण प्रकल्पात गेलेल्या सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीला मोबदला मिळवून देण्याचा प्रश्न, नागरिकांना येण्या-जाण्यासाठी रेल्वेचे अंडरपास ब्रिज किंवा ओव्हरपास ब्रिज मंजुर करणे, रेल्वे स्थानकांची सुधारणा करणे आदी विषयावर खा.श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत अनेकदा आवाज उठवून बरेचसे प्रश्न मार्गी लावले आहेत. तसेच वेळोवेळी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे तसेच रेल्वेच्या विभागीय बैठकीत देखील पाठपुरावा केला होता.
यापूर्वीच सातारा रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण झाल्यानंतर आता त्यांच्या प्रयत्नातून कराड आणि लोणंद रेल्वे स्टेशनवर अद्यावत सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी या दोन्ही स्टेशनचा समावेश अमृत महोत्सव योजनेमध्ये झाला आहे. तसेच स्थानिक नागरिकांना, शेतकऱ्यांना रेल्वेमार्ग ओलांडताना अडचणी येऊ नयेत, त्यासाठी वेळ वाया जाऊ नये याकरिता ठिकठिकाणी रेल्वे अंडरपासची आणि उड्डाणपूलांची मागणी खा. श्रीनिवास पाटील यांनी केली होती. त्यानुसार पिंपोडे खुर्द, शिरढोण, जरंडेश्वर आणि पार्ले येथे रेल्वे अंडरपास ब्रिज होणार आहेत.
सदरचे रेल्वे अंडरपास आणि कराड व लोणंद या रेल्वे स्टेशनचा होणारा कायापालट सातारा जिल्ह्याच्या विकासास चालना देणारा ठरेल असा विश्वास खा. श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्याबद्दल त्यांनी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, रेल्वेचे जनरल आणि डिव्हीजनल मॅनेजर यांचे आभार मानले आहेत.