सातारा एमआयडीसीत पाच चोरट्यांच्या टोळक्यांकडून धुडगुस; दोघाजणांना मारहाण करून लुटले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरालगत एमआयडीसी परिसरात पाच चोरट्यांनी अक्षरश: धुडगुस घालत ट्रकचालकांना टार्गेट करत दरोडे टाकले. यावेळी पाच जणांच्या टोळक्याने दोघांना बेदम मारहाण करत भरदिवसा रोकड लुटल्याची घटना घडली मुख्यमंत्री सातार्‍यात असतानाच रविवारी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रविवारी, दि. 18 ऑगस्ट रोजी भरदुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी अचानक धुमाकूळ घातल्याने पोलिसांनी तत्काळ एकावर गुन्हा दाखल केला. बसवराज फकीरआप्पा गुजनाल (वय 30, रा. शहाबंदर, जि. बेळगाव) यांनी पाच अनोळखी युवकांविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार गुजनाल हे सातारा एमआयडीसी येथे कंपनीत साहित्य घेऊन आले होते. ट्रक गोडावूनमध्ये असताना ते चालत चहा पिण्यासाठी रस्त्यावर आले. यावेळी दुचाकीवरुन अनोळखी पाच युवक तेथे आले. ‘तू बिहारचा आहेस का? तुझ्याकडील पैसे काढ,’ असे म्हणत मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरुवात केली. अचानक पाच जणांनी लाकडी दांडक्याने हल्ला केल्याने तक्रारदार गुजनाल घाबरले. संशयित टोळक्याने मारहाण करत गुजनाल यांच्या खिशातील 500 रुपये काढून घेत पळ काढला.

यानंतर तक्रारदार गुजनाल हे ट्रकजवळ आले व भावाला घडलेल्या घटनेची माहिती दिली. यामुळे परिसरात बघ्यांची गर्दी झाली. त्यावेळी आणखी काही ट्रक चालकांनाही अनोळखी टोळक्याने मारहाण करुन जबरदस्तीने पैसे काढून घेतल्याचे समोर आले. तक्रारदार गुजनाल यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करत संशयितांचे वर्णन घेतले. या टोळक्याच्या हल्ल्यात एक ट्रक चालक जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असल्याचे समजले.