साताऱ्यात दोघे ताब्यात, 2 पिस्टल अन् 3 जिवंत काडतुसे जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीमुळे जिल्ह्यात पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेने सातारा शहरात दोघांना ताब्यात घेऊन देशी बनावटीचे दोन पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे हस्तगत केली. तसेच या घटनेत एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमालही हस्तगत केला. या घटनेतील एक संशयित जावळी तालुक्यातील तर दुसरा सांगली जिल्ह्यातील आहे.

ओंकार राजाराम काकडे (वय २१, रा. शिरटे, ता. वाळवा, जि. सांगली) आणि गोरख सीताराम महाडिक (वय ४०, रा. घोटेघर, ता. जावळी) अशी ताब्यात घेत नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस अधीक्षक समीर शेख व अतिरिक्त पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोम्बिंग ऑपरेशन राबवून तपासणीची सूचना स्थानिक गुन्हे शाखेला केली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलिस निरीक्षक रोहित फार्णे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक करून कारवाईबाबत सूचना केलेली.

गुरुवारी रात्रीच्या सुमारास हे पथक सातारा शहरातील गेंडामाळ परिसरात कोम्बिंग ऑपरेशन करत असताना पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना शाहूपुरी ते आदर्श काॅलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोघे जण दुचाकीवरून (एमएच, १०, ईएफ, ७६०४) गावठी बनावटीचे पिस्टल विक्री करण्यास येणार आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक फार्णे व पथकाला कारवाईची सूचना केली.

गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ओंकार राजाराम काकडे (वय २१, रा. शिरटे, ता. वाळवा, जि. सांगली) आणि गोरख सीताराम महाडिक (वय ४०, रा. घोटेघर, ता. जावळी) यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतल्यावर देशी बनाटवटीचे दोन पिस्टल, तीन जिवंत काडतुसे, एक रिकामे मॅग्झिन आणि दुचाकी असा १ लाख ९५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलिस निरीक्षक देवकर, सहायक निरीक्षक फार्णे, सुधीर पाटील, पृश्वीराज ताटे, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, मदन फाळके, तानाजी माने, हवालदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, अमित झेंडे आदींनी सहभाग घेतला.