सातारा प्रतिनिधी | चार बहिणींच्या नावे असलेली सुमारे १ कोटी ९५ लाख रुपये किंमतीची १३ गुंठे जमीन खोटी कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. कुलदीप संपतराव पवार, अजित विश्वास कदम अशी दोघा संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी आशालता उध्दवराव निकम (वय ६२, रा. करंजे, ता. सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. ३१ जुलै २०१७ पासून ते ९ जानेवारी २०२३ या कालावधीत घडली आहे. तक्रारदार आशालता निकम यांना आणखी तीन बहिणी आहेत. चारही बहिणींच्या नावे १३ गुंठे जमीन आहे. मात्र संशयित पवार व कदम यांनी चौघी बहिणींच्या नावे स्टॅम्प पेपर खरेदी केला. त्यांच्या नावे खोटे प्रतिज्ञापत्र बनवून त्यावर बनावट सह्या केल्या.
खोट्या प्रतिज्ञापत्राद्वारे तयार केलेली कागदपत्रे महाराष्ट्र रियल इस्टेट नियामक प्राधिकरण यांच्याकडे दाखल करुन विश्वकॉन एम्पायर नावाने महाराष्ट्र रियल इस्टेट नियामक प्राधीकरण यांचे सर्टीफिकेट मिळवले. अशा प्रकारे खोटी कागदपत्रे बनवून ती खरी म्हणून वापरुन तक्रारदार आशालता निकम क त्यांच्या तीन बहिणींच्या हिशाची जमीन कब्जात घेवून फसवणूक केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आशालता निकम यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.