सातारा प्रतिनिधी | प्रेमप्रकरण असल्याचा संशय मनात धरून दुचाकीस्वारास कारने उडवून ठार केल्याप्रकरणी सोमवारी येथील पोलिसात कारचालक, त्याचा भाऊ व एका महिलेवर कट रचून खून केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कारचालक अद्याप फरारी असून, त्याचा भाऊ व महिलेस आज अटक केली आहे. अटकेतील भावास येथील न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत माहिती अशी, की शनिवारी (ता. १३) दुपारी कोरेगावहून जळगावकडे दुचाकीवरून निघालेल्या नीलेश शंकर जाधव (रा. जळगाव) यांना येथील पाटील हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस विशाल चंद्रकांत शिंदे (रा. नांदगिरी- खेड, ता. कोरेगाव) याने त्याच्या ताब्यातील गाडी भरधाव चालवून उडवले. त्यात नीलेश जाधव हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर काल सातारा येथील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, याप्रकरणी मृत नीलेश यांच्या पत्नी पूनम (वय ३३, रा. जळगाव) यांनी येथील पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार प्रथम विशाल शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास करून गाडीतील विशालचा भाऊ संतोष चंद्रकांत शिंदे व एका महिलेवरही कट करून खुनाचा गुन्हा दाखल केल्याचा गुन्हा दाखल करत, त्यांना अटक केली आहे. मात्र, चालक विशाल अद्याप फरारी आहे. चंद्रकांत यास येथील न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अटकेतील महिलेस उद्या (मंगळवार) न्यायालयात हजर केले जाणार आहे.