नोकरीला लावतो म्हणून दोघांना दाखवले आमिष अन् घातला साडेसहा लाखांना गंडा

0
1

सातारा प्रतिनिधी | अलीकडे नोकरीला लावतो असे सांगून अनेक तरुण, तरुणीची पैशाची फसवणूक करण्याच्या घटना घडत आहेत. दरम्यान, अशीच घटना कोरेगाव तालुक्यात घडली आहे. रेल्वेत टीसी म्हणून नोकरी लावते, असे सांगून आर्वी (ता. कोरेगाव) येथील दोघांची सहा लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील महिलेवर रहिमतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजीवनी नीलेश पाटणे (रा. सोनगिरी अंगण बिल्डिंग प्लॉट नंबर तीन, पुणे) असे संशयित महिलेचे नाव असून, यापूर्वी तिच्यावर नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सलीम बादशाह मुलाणी, धनाजी निवृत्ती गायकवाड (दोघे रा. आर्वी) या दोघांची फसवणूक झाली आहे. याबाबत रहिमतपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीवनी पाटणे ही संशयित महिला सप्टेंबर २०१९ मध्ये आर्वी येथे सलीम मुलाणी यांच्या घरी आली होती व मुलांनी यांच्या मुलाला रेल्वेमध्ये टीसी करण्यासाठी पैशाची बोलणी करत होती. याची माहिती धनाजी गायकवाड यांना मिळाली असता त्यांनी मुलाणी यांना आपल्या मुलालाही नोकरी लावण्यासाठी पाटणेला विचारण्यास सांगितले. त्यावर संजीवनी पाटणे हिने नोकरीसाठी सहा लाख भरावे लागतील, असे सांगितले व पैसे भरल्यानंतर पंधरा दिवसांत मुलांना रेल्वेमध्ये टीसीची नोकरी लावू, असे आश्वासन दिले होते. २०२१ मध्ये पाटणेचा फोन बंद लागत असल्याने सलीम मुलाणी, धनाजी गायकवाड या दोघांनी घरी जाऊन पाहणी केली असता तिने रूम सोडली असल्याचे सांगण्यात आले.

शोध घेतला असता ती सापडली नाही. त्यानंतर निगडी पोलिस ठाण्यात संजीवनी पाटणेला अटक झाल्याचे या दोघांना समजले. तेथे तक्रार देण्यासाठी दोघेही गेले असता संजीवनी पाटणे कोठेही नोकरीला नसून नोकरीला लावते, असे आमिष दाखवून फसवणूक करण्यात सराईत आहे, अशी माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी अटक केली असल्याने आता पैसे परत मिळतील असे वाटत असताना आत्तापर्यंत संजीवनी पाटणे यांचा कोणताही संपर्क झाला नसल्याने तिच्याविरुद्ध धनाजी गायकवाड यांनी रहिमतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार घाडगे करत आहेत.