कराड प्रतिनिधी | कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोघांना दोन वर्षांसाठी सातारा आणि सांगली जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. प्रशांत ऊर्फ परशुराम रमेश करवले (वय २३, रा. कृष्णा घाट, सोमवार पेठ, कराड) आणि निशिकांत निवास शिंदे (वय २१, रा. रेठरेकर कॉलनी, कराड), अशी त्यांची नावे आहेत.
या दोघांविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकणे, दरोड्याची तयारी करुन बेकायदा पिस्टल बाळगणे, जबरी करणे, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, गर्दी मारामारीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगाव, आटपाडी तालुक्यातुन दोन वर्षे तडीपार करण्याचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरणाकडे सादर केला होता. डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी प्रस्तावाची चौकशी केली होती.
संशयितांना वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांच्या प्रवृत्तीत बदल झाला नाही. कायद्याचा धाक न राहील्यामुळे कराड शहर तसेच आसपासच्या परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर त्यांचा उपद्रव होत होता. त्यामुळे कारवाईची मागणी नागरिकांकडून होत होती. हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दोन वर्षाकरीता दोघांच्या हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे. आतापर्यंत एकूण ११४ जणांविरुद्ध तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण देवकर, उपनिरीक्षक तानाजी माने हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो. कॉ. केतन शिंदे, कॉ. अनुराधा सणस, कराड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार संजय देवकुळे, कॉ. आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी पुरावा सादर केला.