सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक प्रकार घडत असतात. अनेक मागण्यांवरून आंदोलने, मोर्चे होतात. त्यावेळी कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील ठेवला जातो. मात्र, काल, सोमवारी या ठिकाणी एक धक्कादायक प्रकार घडला. या ठिकाणी उपोषणासाठी आलेल्या दोन आंदोलकांनी महिला पोलिस उपनिरीक्षक तसेच एका महिला पोलिसाला मारहाण केली. याप्रकरणी संबंधित आंदोलकांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शोभा शंकर खोत, ओंकार शंकर खोत (रा. शाहूनगर गोडोली, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा येथील शाहूनगर गोडोली येथे राहत असलेल्या शोभा खोत आणि ओंकार खोत हे दोघे सोमवार, दि. २५ रोजी दुपारी दीड वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या भिंतीला ‘आमरण उपोषण’ असे लिहिलेला फलक ते लावत होते. त्यावेळी हा फलक लावण्यास पोलिसांनी विरोध केला.
यावेळी दोघांनी सहायक पोलिस निरीक्षक केनेकर यांना अरेरावीची भाषा केली. तर शोभा खोत या शिवीगाळ करून अंगावर धावून गेल्या. महिला पोलिस शहनाज शेख व महिला पोलिस उपनिरीक्षक भोसले यांनी त्यांना विरोध केला असता संबंधितांनी त्यांना हाताने मारहाण केली. तर शोभा खोत यांनी जोरजोरात ओरडून पोलिसांविषयी अपशब्द वापरले. या प्रकारानंतर महिला पोलिस शहनाज शेख यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून याबाबत सहायक पोलिस निरीक्षक पालवे या अधिक तपास करीत आहेत.